आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून सिडकोचा प्रायोगिक प्रकल्प अंतिम टप्प्यात
नवी मुंबई :- गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांच्या मोडकळीस आलेल्या घरांचा प्रश्न मार्गी लागावा याकरिता बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी शासन दरबारी सतत पाठपुरावा केला होता. राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांनीही समूह विकास योजनेतून सदर घरांचा पुनर्विकास करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते.
याच अनुषंगाने बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी बेलापूर गावातील ग्रामस्थांसह बैठक घेऊन गावठाणातील मोडकळीस आलेल्या घरांचा एकत्रित समूह विकास योजनेतून पुनर्विकास करण्याची सुरुवात बेलापूर गावातून करण्याचे सूचित केले होते. बेलापूर गावातील ग्रामस्थांनीही पुढाकार घेऊन त्यांची सुमारे 17गुंठे जागा पहिला प्रायोगिक प्रकल्प (पायलट प्रोजेक्ट) तयार करण्याकरिता सिडकोस दिली. सिडकोनेही नगरविकास प्रधान सचिव डॉ. नितीन करीर यांजसह बैठक घेऊन सदर प्रोजेक्टचे काम सुरू केले. सदर पायलट प्रोजेक्टचे काम अंतिम टप्यात आले असून लवकरच बेलापूर गावातील ग्रामस्थांच्या घरांचा पुनर्विकास होणार असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी सूचित केले असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. सदर 17 गुंठे जागेत होणाऱ्या प्रकल्पाची सुरुवात झाल्यामुळे शासनाने 2000 चौ.मी. जागा आवश्यक असलेली अट रद्द करण्याचे आदेश सिडकोला दिले असल्याचेही आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. बेलापूर गावप्रमाणेच नवी मुंबईतील सर्व गावांचा विकास होणार असून गेली 30 वर्षे मागील नेत्यांनी काहीच कामे केली नसल्याचेही त्या म्हणाल्या..
नवी मुंबई क्षेत्रात सर्व प्रथम बेलापूर गावाचा पुनर्विकास होणार असल्याने बेलापूर गावातील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी आमदार मंदाताई म्हात्रे व सिडकोचे आभार मानले.