नवी मुंबई :- येत्या रविवारी म्हणजेच दि.१८ मार्च २०१८ रोजी गुढी पाडवा व मराठी नववर्ष. याच दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष व मराठी माणसाचे श्रद्धास्थान आदरणीय राजसाहेब ठाकरे यांची दादर शिवतीर्थावर जाहीर सभा होणार आहे. या दिवशी नवी मुंबई विद्युत विभागाने सर्वतोपरी काळजी घेऊन नवी मुंबईत कोठेही वीज पुरवठा खंडित करू नये असे निवेदन शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखालील मनसेच्या शिष्टमंडळाने आज विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता यांना दिले.
दरवर्षी मनसे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे गुढी पाडव्याला दादर शिवतीर्थावर जाहीर सभेच्या माध्यमातून महाराष्ट्र सैनिकांशी संवाद साधतात व मार्गदर्शन करत असतात. पक्षाची वाटचाल व राजकीय भूमिका या सभांमधुनच आदरणीय राजसाहेब जाहीरपणे मांडत असतात. लाखोंच्या संख्येने महाराष्ट्र सैनिक यादिवशी सभेला राज्यभरातून येतात. तर त्याहून अधिक संख्येने जनता टीव्ही व इंटरनेटच्या माध्यमातून सभेचे थेट प्रक्षेपण पाहत असल्याचे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. मात्र मागील काही घटनांमधून सभा चालू झाल्यानंतर जाणूनबुजून वीज पुरवठा खंडित करण्याचे प्रकार होत असल्याचे मनसेने विद्युत विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यामागे इतर राजकीय पक्षांचा पोटशूळ अथवा सभेबाबत धास्ती असल्याचे मनसे शहर सचिव संदीप गलुगडे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
येत्या रविवारी गुढी पाडव्याला नवी मुंबईत वीज पुरवठा कुठेही खंडित करू नये, विद्युत विभागाने वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी सर्वतोपरी काळजी घ्यावी व याउपर जर वीज पुरवठा खंडित झाला तर महाराष्ट्र सैनिक आपल्या पद्धतीने त्यास उत्तर देतील असा विनंती वजा इशारा मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी नवी मुंबई विद्युत विभागाला दिल्याचे मनसेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
याप्रसंगी मनसेच्या शिष्टमंडळात शहर अध्यक्ष गजानन काळे, शहर सचिव संदीप गलुगडे, नितीन चव्हाण, अप्पासाहेब कोठुळे, संदेश डोंगरे, सनप्रीत तुर्मेकर, स्वप्नील गाडगे, प्रवीण वाघमारे, सागर सुर्वे, सुहास मिंडे, अर्जुन देवेंद्र, विराट शृंगारे, अनिकेत पालकर, विशाल भणगे, शरद दिघे व मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते.