नवी मुंबई :- स्वच्छ शहराप्रमाणेच वृक्षराजी जोपासणारे पर्यावरणशील शहर ही नवी मुंबईची ओळख दृढ होण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका प्रयत्नशील असून याकामी जनजागृती व्हावी व लोकांमध्ये वृक्षप्रेमाचा संदेश प्रसारित व्हावा तसेच नागरिकांनी घरात, आवारात कच-यापासून खतनिर्मिती करून आपली आपणच बाग फुलवावी अशी मनोभूमिका तयार करण्याकरिता हे प्रदर्शन अत्यंत लाभदायक ठरेल असा विश्वास व्यक्त करीत नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते नवी मुंबई महानगरपालिका वृक्षप्राधिकरण आयोजित बाराव्या झाडे, फुले, फळे व भाजीपाला प्रदर्शनाचा शुभारंभ झाला.
याप्रसंगी बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे, ऐरोली विधानसभा सदस्य आमदार श्री.संदीप नाईक, उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त तथा वृक्ष प्राधिकरण अध्यक्ष डॉ. रामास्वामी एन., स्थायी समितीच्या सभापती श्रीम. शुभांगी पाटील, सभागृह नेता श्री. रविंद्र इथापे, परिवहन समिती सभापती श्री. प्रदीप गवस, नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, श्री.नामदेव भगत, श्री.किशोर पाटकर, श्री.विलास भोईर, श्री.गिरीश म्हात्रे, श्रीम.सलुजा सुतार, श्रीम.उषा पाटील, श्रीम.मीरा पाटील, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकुश चव्हाण व श्री. रमेश चव्हाण, उद्यान विभागाचे उपआयुक्त तथा वृक्ष प्राधिकरण सचिव श्री. तुषार पवार, परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री.दादासाहेब चाबुकस्वार, पर्यावरण तज्ज्ञ तथा परीक्षक समिती प्रमुख श्री.व्ही.ए.रोडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने, वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली आज 16 मार्चपासून रविवार दि. 18 मार्चपर्यंत झाडे, फुले, फळे, भाजीपाला यांचे 12 वे प्रदर्शन व त्यासोबत उद्यान स्पर्धा संपन्न होत आहेत. हे प्रदर्शन सेक्टर 19 नेरूळ येथील नवी मुंबईचे आकर्षण केंद्र असलेल्या वंडर्स पार्क याठिकाणीसंपन्न होत असून या 3 दिवसात प्रदर्शनाला भेट देणा-या नागरिकांना वंडर्स पार्कमध्ये विनामूल्य प्रवेश आहे. या प्रदर्शनाच्या अनुषंगाने विविध स्पर्धा घेण्यात येत असून त्यांचा पारितोषिक वितरण सोहळा18 मार्च रोजी सायंकाळी 4.30 वा. महापौर श्री. जयवंत सुतार व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या प्रदर्शनात एकाच छताखाली झाडे, पाने, फुले, फळांमधली विविधता अनुभवता येणार असून नागरिकांनी विशेषत्वाने आपल्या मुलांसह या प्रदर्शनाला आवर्जुन भेट द्यावी व त्यांच्या मनात लहान वयापासूनच निसर्गप्रेम वाढीस लावण्यासाठी योगदान द्यावे असे सर्व नागरिकांना प्रदर्शनाच्या निमित्ताने आवाहन करीत महापालिका आयुक्त तथा वृधप्राधिकरण अध्यक्ष डॉ. रामास्वामी एन. यांनी शहर स्वच्छतेकडे कटाक्षाने लक्ष देताना यापुढील काळात शून्य कचरा संकल्पनेची अंमलबजावणी करण्याकडे विशेषत्वाने लक्ष दिले जाईल आणि त्यादृष्टीने नागरिकांनी घरापासूनच आपला कचरा ओला व सुका असा वेगवेगळा करण्यासोबतच यातील ओल्या कच-यापासून खतनिर्मिती करावी व त्याचा उपयोग किचन गार्डन विकसित करण्यासाठी करावा यादृष्टीने प्रयत्न केले जातील असे सांगितले.
या प्रदर्शन / स्पर्धेमध्ये सुर्यप्रकाशात वाढणारी कुंड्यांमधील बहुवर्षीय फुलझाडे, सावलीत वाढणारी कुंड्यांमधील बहुवर्षीय फुलझाडे, कुंड्यांमध्ये वाढविलेल्या फळभाज्या व फळझाडे, भाजीपालाफळभाज्या शेंगभाज्या मुळभाज्या, फळफळावळ, कुंड्या व परड्यांमधील हंगामी फुलझाडे, कुंड्यांतील फुलझाडे, कुड्यांमधील शोभिवंत पानांची झाडे झुडपे, कुंड्यांमधील सुगंधीत व औषधी उपयुक्त वनस्पती,विविध प्रकारचे गुलाब, दांडीसह मोसमी फुले, दांडीसह वार्षिक फुले, निवडुंग मदवृक्ष व अननस वर्गीय वनस्पती, आमरी (ऑर्कीड), नेचे, झुलत्या झाडांच्या परड्या, वामनवृक्ष (बोन्साय), भाज्या फळे फुलेयांच्या कलात्मक रचना, निसर्ग व पर्यावरणावर आधारीत चित्रे, उद्यानाची प्रतिकृती, खास विद्यार्थ्यांसाठी पाने, फळे, फुले, भाजीपाला यांची ओळख स्पर्धा, बाग स्पर्धा असे 24 विभाग असून या प्रदर्शनातएकाच छताखाली वृक्षप्रेमी नागरिकांना निसर्गातील वैविध्य बघण्याची व स्पर्धांतून स्वत:चे नैसर्गिक कलागुण सिध्द करण्याची आणि त्यामधून निसर्गाशी जवळीक साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
या प्रदर्शनामध्ये रिलायन्स कॉर्पोरेट आय.टी.पार्क, मध्य रेल्वे, रिलायन्स कम्युनिकेशन, रहेजा कॉर्पो., गिगा प्लेक्स, रूट ब्रीज अशा नामांकित उद्योगसमुहांचा सहभाग असून याठिकाणी विविध फुलझाडे, फळझाडे, खते, घरगुती तसेच छोट्या व मोठ्या बागेसाठी आवश्यक उपकरणे, साहित्य यांचे 70 हून अधिक स्टॉल्स उपलब्ध आहेत. यातील एक विशेष बाब म्हणजे कचरा वर्गीकरणाची माहिती देणा-या स्टॉलप्रमाणेच याठिकाणी कच-याचे घरातच टोपलीव्दारे अथवा आवारात यंत्रणेव्दारे खतात रूपांतर करणा-या उपकरणांचेही स्टॉल्स असून याव्दारे घरात, गच्चीत बाग फुलविण्याविषयी जनजागृती केली जात आहे.
रविवारपर्यंत 3 दिवस चालणा-या या झाडे, फुले, फळे, व भाजीपाला प्रदर्शनाला नागरिकांनी आपल्या कुटुंबिय व विशेषत्वाने मुलांसह तसेच शाळा व महाविद्यालयांनी आपल्या शिक्षक, विद्यार्थ्यांसह प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देऊन निसर्गातील विविधतेचा एकाच ठिकाणी अनुभव घ्यावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने करण्यात येत आहे.