डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासाठी 21 मार्चला उपस्थित राहण्याचे आयोजकांचे आवाहन
पनवेल :- चंदनासारखे आयुष्य झिजवत समाजाकरीता सुगंध सांडणार्या ज्येष्ठ नागरिक एनजींओंशी भाजपाच्या पदाधिकार्यांनी झुंडशाहीने हुज्जत घातल्याने ज्येष्ठांमध्ये अतिशय गंभीर आणि तितकेच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सामाजिक संस्थांनी पनवेल महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी आयोजित केलेल्या नियोजनाच्या बैठकीत भाजपाच्या पदाधिकार्यांनी हा गोंधळ घातला. मात्र, बैठक उधळवून लावण्याचे त्यांचे कटकारस्थान आयोजकांनी समर्थपणे उलथवून लावले.
शहरातील मिडल क्लास हौसिंग सोसायटीच्या मैदानावर सामाजिक संस्था मिळून पनवेल महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्यावर विश्वास व्यक्त करण्यासाठी बुधवारी, (दि. 21) सायंकाळी 6.30 वाजता ‘जनतेचा विश्वासदर्शक ठराव’, कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्याचे नियोजन करण्यासाठी काल सायंकाळी तथास्तु सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी भाजपाच्या पदाधिकार्यांनी सभागृहात घुसून ज्येष्ठांना नाहक त्रास देण्याचा उपद्व्याप केला.
बैठकीला प्रारंभ करण्यापूर्वी आयोजकांनी उपस्थित भाजपा नगरसेवकांनाही व्यासपिठावर सन्मानाने विराजमान केले. त्यामध्ये भाजपाच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती दर्शना भोईर यांचा समावेश होता. मात्र, सभाशास्त्राला फाटा देत पूर्वनियोजित कटानुसार भोईर यांनी नियोजनावर काही बोलण्यापेक्षा आयुक्तांच्याविरोधात वक्तव्य करण्यास सुरूवात केली. त्यावर ज्येष्ठ नागरिक असणारे एनजीओ श्याम फडणीस, कीर्ती मेहरा, मुकूंद इनामदार आणि अन्य सामाजिक संस्थांच्या ज्येष्ठांनी विरोध दर्शवित सभाशास्त्रानुसार अजेंठ्यावर बोला, असे सुचविले. तेव्हा त्यांच्याशी नाहकपणे दर्शना भोईर, निता माळी, भरत जाधव आदींनी बैठकीत गोंधळ घातल्याने आयोजकांनी हस्तक्षेप करत, नियोजनावर बोला अशी विनंतीवजा सुचना केली. परंतु, त्यांनी रडीचा डाव सुरू ठेवत बैठकीत अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. यासंबंधी काही व्हिडीओ व्हायरल झाल्याने भाजपचे कटकारस्थान उघडे पडले आहे.
बैठकीत नियोजन करण्याऐवजी ती ताब्यात घेण्याची केविळवाणी धडपड करणार्या दर्शना भोईर यांनी त्यांचे भाषण झाल्यानंतर आपल्याला दुसर्या बैठकीला जायचं आहे, त्यामुळे रजा घेतो, असे आयोजक कांतीलाल कडू यांना सांगितले. मात्र, सभागृहाच्या दरवाजापर्यंत जाऊन पुन्हा गोंधळ सुरू ठेवला. त्यातच ज्येष्ठ एनजीओ कीर्ती मेहरा आणि श्याम फडणीस यांच्याशी त्यांनी अरेरावी केली.
भाजपाच्या पहिल्या तुकडीला नियोजनाची बैठक ताब्यात घेण्यात अपयश आल्याने अर्ध्या तासाच्या अंतराने नगरसेवक जगदिश गायकवाड, संतोष शेट्टी, किशोर चौतमल यांचे आगमन झाले. गायकवाड यांनी आयुक्तांविरोधात भाषण ठोकले. मात्र, आयोजक कांतीलाल कडू यांच्यावर दिलखुलासपणे स्तुतीसुमने उधळून भाजपा नेत्यांना सणसणीत चपराक लगावली. तेव्हा भाडोत्री कार्यकर्ता भरत जाधव याची कोल्हेकुई थांबली.
या बैठकीत भाजपाने कफचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ समाजसेवक अरूण भिसे यांनाही अपमानास्पद शब्द वापरले तर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर टीकेची झोड उठवून भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीचे दर्शन घडवले.
भाजपाचे कटकारस्थान ओळखून आयोजक कांतीलाल कडू यांनी त्यांच्या वक्त्यांना भाषणे करण्याची संधी दिली. मात्र, सभाशास्त्र सोडून त्यांनी बेताल वक्तव्य केल्याने उपस्थितांनी त्यांना विरोध करत निषेध नोंदविला. वक्त्यांमध्ये दर्शना भोईर, मनोहर मुंबईकर, कीर्ती नवघरे, निता माळी, जगदिश गायकवाड आदींचा समावेश होता. संतोष शेट्टी यांनी भाषणाला सुरूवात करताच, उपस्थित पोलिसांच्या निदर्शनास त्यांचा डाव आल्याने त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखत आयोजकांना बैठक थांबविण्याची विनंती केली. त्यांचा मान राखत कडू यांनी बैठक संपल्याचे घोषित केले. तत्पूर्वी त्यांनी बुधावारच्या (दि. 21) जाहिर सभेला पनवेलकरांचा आवाज व्यक्त करण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
व्यासपिठावर कांतीलाल कडू, अरूण भिसे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, शेकापचे जिल्हाप्रमुख गणेश कडू नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर, अरूण भिसे, नगसेविका प्रिती जॉर्ज, हरेश केणी, हेमलता गोवारी, पापा पटेल, रवी भगत, सचिन गायकवाड, डी. पी. म्हात्रे, गणेश म्हात्रे, बापू सांळुखे यांच्यासह शेकडो सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि सामान्य नागरिक उपस्थित होते.
———————————————————————————————–
बंद सभागृहातील बैठकीला पोलिस परवानगीची गरज नाही
सामाजिक संस्थांनी आयोजित केलेली नियोजनाची बैठक होती. त्याला पोलिसांची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. बैठक सुरू असताना तिथे कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होत असल्याचे आमच्या अधिकार्यांनी कळविल्याने आयोजकांना बैठक थांबविण्याचे निर्देश दिले. कायद्याचा सन्मान करत त्यांनी त्याच क्षणाला बैठक संपल्याचे घोषित केले.
– विनोद चव्हाण
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पनवेल शहर