‘गुटखा किंग’ला पोलिस आणि एफडीएचा दणका
पनवेल:- पनवेल तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्हा ‘गुटखामुक्त’ करण्याचा संकल्प ‘पनवेल संघर्ष समिती’ने केला आहे. त्याआधारे नवी मुंबईचे खंडणी विरोधी पथक आणि रायगडच्या अन्न व औषध प्रशासनाने संयुक्तपणे कारवाई करत पनवेल येथील ‘गुटखा किंग‘ला चांगलाच दणका दिला आहे. या कारवाईत पनवेलमधील गुटखा किंगच्या कच्ची मोहल्ला परिसरातील गुटखा साठवलेल्या गोडाऊनवर छापा टाकण्यात आला. यावेळी 1 लाख 52 हजार रुपयांचा गुटखा आणि पान मसाला जप्त करून एफडीएने गोडाऊन सील केले आहे. मोहम्मद शाकेब अन्सारी असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
कच्ची मोहल्ला परिसरात तथाकथित मुशेफ नामक ‘गुटखा किंग’ हा अवैधपणे गुटखा विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. तसेच गुटखा किंगच्या गोडाऊनमध्ये गुटखा भरून टेम्पो भरून आणणार असल्याची माहितीही मिळाल्याने खंडणी विरोधी पथकाने सापळा रचला. यावेळी खंडणी विरोधी पथकाने टाकलेल्या छाप्यात गोडाऊनमध्ये अवैध गुटखा व पान मसाला असल्याचे आढळून आले.
त्यानंतर तत्काळ खंडणी विरोधी पथकाने रायगडच्या अन्न व औषध प्रशासनाला कल्पना देऊन पुढील कारवाई करण्यासाठी बोलावून घेतले. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी रमाकांत कुलकर्णी यांनी गुटखा साठविलेले गोडाऊन सील केले आहे. याप्रकरणी मोहम्मद शाकेब अन्सारी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खंडणी विरोधी पथक व अन्न औषध प्रशासन रायगड यांच्या या धडक कारवाईने अवैध गुटखा व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान राज्यभरात गुटखाबंदी असतानाही सर्रास विक्री होत असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे.