नवी मुंबई :- उन्हाळा सुरू झाला असून कडाक्याचे ऊनही आता चांगलेच जाणवू लागले आहे. मनुष्याला तहान लागली तर तो पाणी अथवा सरबत पिवून आपली तृष्णा भागवू शकतो, पण मुक्या प्राण्यांचे काय? ते तहान लागल्यावर हंबरडा फोडतील अथवा पाण्यासाठी वणवण भटकतील. याच मुक्या प्राण्यांना पाणी मिळावे याकरिता राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानकडून ‘एक थेंब मुक्या जीवासाठी’ हा अभिनव प्रकारातील स्तुत्य उपक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे.
वेस्टर्न कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एकत्रित येवून सानपाड्यात हा उपक्रम राबविला असून लवकरच हा उपक्रम नेरूळमध्येही राबविला जाणार असल्याची माहिती राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे सदस्य अक्षय काळे यांनी दिली. सानपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पशू पक्ष्यांसाठी पाणवठे तयार केले आहेत. यावेळी कॉलेजमधील प्रतिष्ठानचे सदस्य अक्षय काळे, सुरज कांबळे, मयुर गुंजाळ यांच्यासह कॉलेजचे अन्य विद्यार्थी, मित्र परिवार व स्थानिक रहीवाशी उपस्थित होते. या उपक्रमाची परिसरात प्रशंसा होत असून मुलांनी चांगले कार्य केले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.