पनवेल :- अनेक वर्षे जटिल बनलेल्या पनवेलच्या वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी कळंबोली ते पळस्पेपर्यंत उड्डाणपूलाची नितांत आवश्यकता आहे. भविष्यात ही समस्या अधिक उग्र बनणार असल्याने एमएमआरडीने उड्डाणपूलाची उभारणी करावी, अशी मागणी पनवेल संघर्ष समितीने सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा एमएमआरडीएच्या स्वतंत्र खात्याचे मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांची भेट घेवून केली.
पनवेल शहराच्या भोवताली औद्योगिक आणि नागरिकरण वाढत चालले आहे. दळणवळणाची साधने वाढत आहेत. राज्य व केंद्र शासनाने रस्त्याचे जाळे विणले आहे. परंतु नियोजनाचा फज्जा उडत असल्याने आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिक गंभीर बनत चालला आहे, हे ना. शिंदे यांच्या निदर्शनास संघर्ष चे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी आणून दिले.
नवी मुंबईचा आंतरराट्रीय विमानतळ प्रकल्प होत आहे. सिडकोने काही रस्ते ताब्यात घेतले आहेत. त्यांची दूरवस्था झाली आहे. प्रत्यक्षात विमानतळ अस्तित्वात येईल तेव्हा वाहतूक कोंडीचा श्वास अधिक कोंडला जाईल.
कोकण, गोवाकडे जाणारे चाकरमानी, पर्यटक तसेच अवजड वाहतूक पनवेल शहरातून होत आहे. मुंबई-गोवा चौपदरीकरणामुळे सर्व वाहतूक पनवेल शहरातून होणार असल्याने पनवेल परिसरातील वाहतुकीवर तिचा ताण पडणार आहे. आताच वाहन चालक, स्थानिक रहिवाशी, कळंबोली, कामोठे, खांदा कॉलनी, नवीन पनवेल, पनवेल आणि ग्रामीण भागातील वाहतुकीची रेलचेल पनवेल शहरातून जाणाऱ्या मार्गाने होत असल्याने रस्ते फुटतात तशी वाहने धावतात आणि वाहतूक रोडावते. त्याशिवाय वाहतूक खात्याकडे अपुरे कर्मचारी दल त्यावर मार्ग काढण्यास अपयशी ठरत असल्याने कळंबोली ते पळस्पे उड्डाणपूल बांधला गेल्यास वाहतूक कोंडीच्या कटकटीतून पनवेल आणि आजुबाजुच्या शहरे आणि ग्रामीण भागातील नागरिकांची या त्रासातून कायमची मुक्ती होईल, असा दावा ना. शिंदे यांच्याशी बोलताना कडू यांनी केला.
एमएमआरडीएने यापूर्वीच 189 कोटी रुपये खर्च करून शहरापुरता उड्डाणपूल उभारला आहे. तो सुध्दा अपुरा पडत आहे. भविष्याचा विचार करता त्याला जोडून हा पुल उभारल्यास वाहतूक कोंडीवर रामबाण उपाय ठरेल, असे मत कडू यांनी लेखी निवेदनातून व्यक्त केले आहे.
ना. शिंदे यांच्या भेटीच्या वेळी उज्वल पाटील, चंद्रकांत शिर्के आणि मंगल भारवाड उपस्थित होते. ही भेट त्यांच्या ठाणे येथील कार्यालयात घेतली.
————————————————————————–
लवकरच सर्वेक्षण केले जाईल
पनवेल आणि परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यास आपण अनुकूल आहोत. लवकरच संबंधित अधिकाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या जातील. त्यानंतर राष्ट्रीय रस्ते विकास, एमएमआरडीa किंवा महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमांतून कळंबोली ते पळस्पे उड्डाणपूल उभरता येईल.
याविषयी आपण लवकरच बैठकही घेवू.
– ना. एकनाथ शिंदे
(मंत्री, महाराष्ट्र राज्य )