मुंबई : पालघर व ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील कुपोषण, ग्राम बाल विकास केंद्रे, विविध विभागातील रिक्त पदे, सार्वजनिक आरोग्य विभागाची रुग्णालये, धान्य पुरवठा, वन हक्क कायद्याची प्रकरणे आदींचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. आदिवासी भागातील समस्या निराकरणासाठी केलेल्या उपाययोजनांची कार्यवाही कालबद्ध पद्धतीने करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
माजी आमदार विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखालील श्रमजीवी संघटनेच्या शिष्टमंडळाने आज विविध मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, आदिवासी विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहार योजनेचा तसेच ग्राम बाल विकास केंद्राच्या कामाचा येत्या पंधरा दिवसात आढावा घेण्यात यावा. तसेच या भागात धान्य पुरवठा व्यवस्थित होण्यासाठी संबंधित विभागाने कार्यवाही करावी. आरोग्य विभागाअंतर्गत पालघर व ठाणे जिल्ह्यातील आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्यात आली आहेत. विक्रमगड, तलासरी व डहाणू येथे येत्या तीन महिन्यात 100 वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच या भागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठीच्या निवासस्थांनाच्या दुरुस्ती तातडीने करण्यात याव्यात. कामगारांना देण्यात येणाऱ्या किमान वेतनसंबंधी लवकरात लवकर समिती स्थापन करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या.
आदिवासी भागातील समस्यांच्या उपाय योजनासंदर्भातील कार्यवाहीचा आढावा तीन महिन्यानंतर पुन्हा घेण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले, आदिवासी भागातील कुपोषणमुक्तीसाठी आरोग्य विभागाकडून ठोस पावले उचलण्यात येत आहेत. त्यामुळे बालक मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे. गरोदर मातांना हिमोग्लोबिन वाढण्यासाठी प्रत्येक आरोग्य केंद्रात इंजेक्शनची व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्य शासनाने आदिवासी भागातील बालकांसाठी भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम अमृत आहार योजना, मध्यम तीव्र व तीव्र कुपोषित बालकांसाठी पोषण पुनर्वसन केंद्र व बाल उपचार प्राथमिक केंद्रे सुरू करणे, जव्हार, मोखाडा व विक्रमगड भागात 108 क्रमांकाची अँब्युलन्स सेवा तसेच अंगणवाडी सेविका व इतर कामगारांच्या मागण्यासंदर्भात उपाययोजनांची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी सुरू केल्याचे नमूद करून श्री. पंडित यांनी राज्य शासनाचे व मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे आभार मानले. तसेच उर्वरित मागण्यांवर लवकरात लवकर कार्यवाही करण्याची विनंती केली.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव मुकेश खुल्लर, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव प्रदीप व्यास,वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय देशमुख, ठाण्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.