दिपक देशमुख
नवी मुंबई :- गुढीपाडवा, मराठी नववर्षाचा पहिला दिवस. नेरूळमध्ये गुढीपाडव्याचा दिवस स्वागतयात्रांनी गाजला. नेरूळ पश्चिमेला आणि पूर्वेला दोन्ही ठिकाणी काढण्यात आलेल्या स्वागतयात्रेमध्ये स्थानिक रहीवाशी, महिला मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
नेरूळ पश्चिमेला सेक्टर ६ येथील शिव गणेश मंदिरापासून स्वागत यात्रेला सुरुवात झाली. सेक्टर १० येथील साईबाबा हॉटेलजवळील चौकात या स्वागत यात्रेची सांगता झाली. या स्वागत यात्रेत ठाण्याचे माजी खासदार डॉ. संजीव नाईक, शिवसेनेचे माजी पालिका पक्षप्रतोद रतन नामदेव मांडवे, युवा सेनेचे बेलापुर उपविधानसभा अधिकारी निखिल रतन मांडवे, नगरसेवक गिरीश म्हात्रे,शिवसेना शाखाप्रमुख गणेश कुलकर्णी, बाबु तळेकर, नामदेव सस्ते, शरद पांजरी, वाघमारे, विशाल गुंजाळ, अजय तळेकर यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी व स्थानिक रहीवाशी सहभागी झाले होते.
नेरूळ पूर्वेला निघालेल्या स्वागत यात्रा लक्षणीय ठरली. या स्वागत यात्रेत मोठ्या संख्येने स्थानिक रहीवाशांसोबत नेरूळ नोडमधील विविध ठिकाणचे लोकही सहभागी झाले होते. डीजेच्या तालावर तरूणाई स्वागत यात्रेमध्ये बेफाम होवून नाचत होती. या स्वागत यात्रेत स्थानिक प्रकल्पग्रस्तांची पालखी मिरवणूक लक्ष वेधून घेत होती. माजी नगरसेवक रतन मांडवे यांच्यासह नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार, अविनाश सुतार, विवेक सुतार, ब प्रभाग समिती सदस्य मनोज यशवंत मेहेर, प्रशांत सोळसकर आदी मंडळी नृत्य करताना पहावयास मिळाली. या स्वागत यात्रेत सुरूवातीपासून शेवटपर्यत तरूणाईचा सहभाग विशेषत्वाने आढळला. विविध ़पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी या स्वागत यात्रेमध्ये सहभागी झाले होते.