दिपक देशमुख
नवी मुंबई : सारसोळेच्या खाडीअर्ंतगत भागात असलेल्या दोन होल्डिंग पॉडकडे जाणार्या रस्त्यांची दुरावस्था झालेली असून रस्ते खचलेले आहेत. त्यामुळे या रस्त्यांची पाहणी करण्यासाठी सारसोळेचे ग्रामस्थ व महापालिका ‘ब’ प्रभाग समिती सदस्य मनोज यशवंत मेहेर यांनी महापौर व आयुक्तांना निमत्रंण देताना या ठिकाणी पाहणी अभियान राबविण्याची मागणी केली आहे.
पामबीच मार्गावर सारसोळेच्या खाडीअर्ंतगत भागात दोन होल्डिंग पॉड आहेत. पावसाळ्यात या होल्डिंग पॉडचे महत्व आपणास जाणवते. होल्डिंग पॉड नसते तर ऐन पावसाळ्यात भरतीच्या काळात शहर वारंवार जलमय झालेले आपणास पहावयास मिळाले असते. सारसोळे खाडीअर्ंतगत भागात असलेल्या दोन होल्डिंग पॉडकडे जाण्यासाठी वाशी रेल्वे स्टेशन परिसरातून तसेच पामबीच मार्गावरील मॉलच्या समोरील बाजूने जाण्यासाठी मार्ग आहेत. या दोन्ही मार्गाची महापालिका प्रशासनाने डागडूजी करून या रस्त्यांचे डांबरीकरण केले होते. परंतु आज या दोन्ही रस्त्यांची दुरावस्था होवून या रस्त्यांना अवकळा प्राप्त झालेली आहे. हे रस्ते जागोजागी पूर्णपणे खचलेले आहेत. ज्या मार्गावरून पूर्वी चार चाकी वाहन जात होते, त्या मार्गावरून आज दुचाकी वाहनही जावू शकत नाही. महापौर व पालिका आयुक्तांनी स्वत: या ठिकाणी पाहणी अभियान राबवून या परिसराची पाहणी केल्यास आपणास आमच्या म्हणण्यातील तथ्य आणि समस्येचे गांभीर्य तात्काळ निदर्शनास येईल, असे मनोज मेहेर यांनी निवेदनात म्हटले आहे.
पामबीच मार्गावरून सारसोळे जेटीपासून वाशीच्या दिशेने जाताना थोडे पुढे आल्यास लगेचच डाव्या बाजूला वळसा मारून आपणास थेट सारसोळे खाडीअर्ंतगत भागात असलेल्या होल्डिंग पॉडकडे जाता येते. हा रस्ता वर्षानुवर्षे कच्चा असला तरी सुस्थितीत आहे. पूर्वी मिठागरे असताना या मार्गावर दररोजचा अडीच ते तीन हजार माणसांचा राबता होता. हा रस्ता कच्चा असला तरी सुस्थितीत आहे. वर्षानुवर्षे या रस्त्याला कोठेही तडे गेलेले नाहीत अथवा खचलेला नाही. आपण पालिका प्रशासनाने बनविलेल्या दोन रस्त्यांची आणि या कच्च्या सुस्थितीतील रस्त्यांची पाहणी करावी. पावसाळा आता तोंडावर आलेला आहे. पावसाळ्यात भरती-ओहोटीच्या काळात होल्डिंग पॉडचे ढापे बसविण्यासाठी अथवा काढण्यासाठी पालिका कर्मचार्यांना ये-जा करावी लागते. खाडीअर्ंतगतचे होल्डिंग पॉडकडे जाणार्या रस्त्यांची सुरक्षितता हा वादाचा आणि संशोधनाचा विषय बनलेला आहे. महापौर व आयुक्तांनी शक्य तितक्या लवकर संबंधित महापालिका अधिकार्यांसमवेत या ठिकाणी पाहणी अभियान राबवावे आणि या अभियानात स्वत: सहभागी होवून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा तसेच या पाहणी अभियानात आपण सारसोळेच्या ग्रामस्थांनाही सहभागी करून घ्यावे अशी मागणी मनोज मेहेर यांनी केली आहे.