पनवेल :- बुधवारी (दि. 21) सायंकाळी 6.30 वाजता पनवेलच्या मिडल क्लास हौसिंग सोसायटीच्या मैदानावर सामान्य नागरिकांचा आवाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या समर्थनार्थ ‘जनतेचा विश्वासदर्शक ठराव’, कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक संस्थांनी संयुक्तिकपणे केले आहे. या सभेला आयुक्तांच्या समर्थकांव्यतिरिक्त इतरांना प्रवेश नाकारण्यात आलेला आहे, अशी माहिती आयोजक कांतीलाल कडू, अरूण भिसे, मंगल कांबळी, दीपक सिंग, प्रभाकर शिंदे, श्याम फडणीस, कीर्ती मेहरा, लेकुरवाले आदींनी दिली.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर व्यक्त करून सामाजिक संस्थांनी या कार्यक्रमात महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्यावर विश्वास व्यक्त करणार्यांनाच प्रवेश देण्याचा अधिकार राखून ठेवला आहे. त्यातून कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होणार आहे. ज्यांना आयुक्तांवर अविश्वास व्यक्त करायचा असेल, त्यांनी स्वतंत्र कार्यक्रम घ्यावा, असे आयोजकांनी सुचवून त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.
सामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी पनवेल, खांदा कॉलनी, नवीन पनवेल, कामोठे, कळंबोली, खारघर, तळोजे तसेच ग्रामीण भागातील सामाजिक संस्था, लेखक, कवी, शैक्षणिक संस्था, ज्येष्ठ नागरिक संस्था, विविध रिक्षा चालक संघटनांनी पाठिंबा देवून ते कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे आयोजकांना कळविण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे लक्ष, आज होणार्या सामाजिक संस्थांच्या विश्वासदर्शक ठरावाकडे लागले आहे.
अतिशय शांततेत आणि वैचारिक लढ्यात सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी अधिक बुलंद करावी, पनवेल महापालिका क्षेत्राचा समतोल विकास व्हावा, याकरीता आपली उपस्थिती महत्वाची ठरणार आहे. महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या जनतेच्या हितकारी निर्णयाला पाठिंबा देवून यापुढे समाजात जनतेचा आदरयुक्त दरारा कायम ठेवण्यासाठी ‘जनतेच्या विश्वासदर्शक ठराव’ कार्यक्रमाचा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात जाणार आहे. त्याकरीता आपल्या उपस्थितीच्या योगदानाची गरज असल्याने मित्र परिवारासह लोकशाही मुल्यांचे जतन करण्यासाठी कार्यक्रमाला आवर्जुन यावे, अशी विनंती आयोजकांनी केली आहे.
यानिमित्ताने पोलिस उपायुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त आणि पनवेल शहर पोलिस, तसेच मिडल क्लास हौसिंग सोसायटीच्या संचालक मंडळाने कार्यक्रमाला रितसर परवानगी दिल्याने आयोजकांनी त्यांचे आभार मानले आहेत. सामान्यांचा अधिकार आदरयुक्त शाबूत राहावा, म्हणून उपस्थित राहणार्या पनवेलप्रेमींचे स्वागत करण्यासाठी आयोजक सज्ज असल्याची माहिती देण्यात आली आहे.