सकारात्मक कार्यवाहीचे नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांचे आश्वासन
मुंबई :- ऐरोली ते कटई नाक्याकडे जाणार्या प्रस्तावित बोगद्यावर नवी मुंबईत चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मार्गिका बांधण्याची मागणी आमदार संदीप नाईक यांनी बुधवारी विधीमंडळ अधिवेशनात पायाभूत सुविधांविषयी लक्षवेधी सुचना मांडून केली. आमदार नाईक यांनी मागणी केल्याप्रमाणे निश्चितच या विषयी माहिती घेवून पुढील कार्यवाही करु, असे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी दिले आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या(एमआरडीए) माध्यमातून ऐरोली ते कटई नाका असा सुमारे १२.३० किलोमिटरचा बोगदा बांधण्यात येणार आहे. त्या करीता ९४४.२० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. नवी मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळाकडे प्रवास करण्याच्या दृष्टीने देखील हा बोगदा महत्वाचा ठरणार आहे. मात्र या बोगद्यावर ठाणे-बेलापूर मार्गावर चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मार्गिका नसल्याची बाब आमदार नाईक यांनी या विषयी वेळोवेळी तारांकीत प्रश्न, पत्रव्यवहार आदींच्या माध्यमातून शासनाच्या लक्षात आणून दिली आहे. नवी मुंबईत मार्गिका नसल्याने मुंबईकडून कल्याणदरम्यान दररोज प्रवास करणार्या हजारो नागरिकांसाठी हे अडचणीचे ठरणार आहे. या नागरिकांना व्यवसाय आणि नोकरीनिमित्ताने या बोगद्याच्या प्रवासात नवी मुंबईत उतरणे आणि चढणे शक्य होणार नाही. त्यामुळे ही मार्गिका बांधण्याच्या अनुशंगाने व्यवहार्यता अहवालाचे(फिजिबिलिटी स्टडी) काम हाती घ्यावे, अशी सुचना आमदार नाईक यांनी लक्षवेधीवर चर्चा करताना शासनाकडे केली. त्यावर या संदर्भात निश्चितच माहिती घेवून पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री पाटील यांनी आमदार संदीप नाईक यांना दिली.