महिन्याभरात बिले मराठी होणार..सचिवांचे लेखी पत्र
नवी मुंबई :- कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्य व मसाला मार्केट मध्ये ग्राहकांना मिळणाऱ्या गुजराती बिलांविरोधात मनसे आक्रमक झाली असून, ही बिले मराठी भाषेत व्यापाऱ्यांनी न दिल्यास या सर्व गुजराती बिलांची एपीएमसी सचिव दालनात होळी करू असा इशारा नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी आज एपीएमसी सचिव शिवाजी पहिनकर यांना दिला. शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखालील मनसेच्या शिष्टमंडळाने याबाबत आज एपीएमसी सचिव शिवाजी पहिनकर यांना घेराव घातला. याप्रसंगी मनसे रोजगार विभागाचे नितीन चव्हाण यांनी एपीएमसी सचिवांसमोर गुजराती बिले फाडून तीव्र निषेध व्यक्त केला.
मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. त्यामुळे नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व बाजारांमध्ये मराठी भाषेचा दैनंदिन व व्यावहारिक वापर करणे अनिवार्य असल्याचे मनसेने निवेदनात म्हटले आहे. ग्राहकांना देण्यात येणारी कृषी मालाची बिले सुद्धा मराठी भाषेतच असावीत असा शासनाचा नियम असल्याचे मनसे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
मात्र गेली अनेक वर्षे धान्य मार्केट व मसाला मार्केट मधील सुमारे १२०० ते १३०० व्यापारी असे आहेत जे ग्राहकांना कृषी मालाची बिले गुजराती भाषेत देतात. गुजराती भाषेतील बिलांमुळे ग्राहकाने किती माल विकत घेतला, किती किमतीचा घेतला याचा कोणताही थांगपत्ता ही बिले वाचल्यानंतर ग्राहकांना लागत नाही. यामागे ग्राहकाची फसवणूक करणे हाच निव्वळ या गुजराती व्यापाऱ्यांचा मनसुबा असल्याचे मनसे उपशहर अध्यक्ष विनोद पार्टे यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात एक दोन वर्षांपूर्वी मनसेने एपीएमसी सचिवांना याची निवेदने व स्मरणपत्रे देऊन आठवण करून दिली होती. मात्र याबाबत कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप मनसे शहर सचिव संदीप गलुगाडे यांनी प्रसिद्धीपत्रकात केला आहे.
महाराष्ट्रात मराठी भाषेला डावलणे हा मराठी भाषिकांचा अवमान असून महाराष्ट्र ननवनिर्माण सेना हे कदापि सहन करणार नसल्याचे मनसेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. मनसेची आक्रमकता पाहून एपीएमसी सचिव शिवाजी पहिनकर यांनी १ महिन्याच्या आत एपीएमसी ग्राहकांना पावत्या व बिले मराठी भाषेत मिळतील तसेच गाळ्यांवरील नामफलक मराठी भाषेत केले जातील व या गोष्टींची अंमलबजावणी न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई कारवाई केली जाईल असे लेखी आश्वासन दिले. यावर एक महिन्याच्या आत सदर गोष्टी न झाल्यास ही सर्व गुजराती बिले जमा करून एपीएमसी सचिव दालनामध्ये जाळू व होळी करू असा इशारा नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी यावेळी दिला.
याप्रसंगी मनसेच्या शिष्टमंडळात शहर अध्यक्ष गजानन काळे, उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले, विनोद पार्टे, सचिव संदीप गलुगडे, प्रिया गोळे, नितीन चव्हाण, सनप्रीत तुर्मेकर, चंद्रकांत महाडिक, अभिलेश दंडवते, विनय कांबळे, अरुण पवार, शरद दिघे, प्रेम जाधव, विक्रांत मालुसरे, श्याम ढमाले, पप्पू शिंदे, रुपेश कदम, राम पुजारे, अर्जुन देवेंद्र, विराट शृंगारे, रोहित गवस, विश्वजित भोईटे, रमेश वाघमारे व मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते.