सुजित शिंदे
नवी मुंबई :- रिक्षाचालक प्रवाशांशी वाद अथवा रस्त्यावर कुठेही रांगा लावणे अथवा अन्य कारणांमुळे रिक्षाचालकांची एकीकडे प्रतिमा वादग्रस्त बनत असतानाच दुसरीकडे मात्र प्रभाकर कलशेट्टी या रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा नेरूळमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. प्रवासी रिक्षामध्ये सामान विसरून गेलेला असताना कलशेट्टी यांनी स्वत: त्याचा शोध घेवून सामान करत केले.
गुरूवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास प्रभाकर कलशेट्टी (रिक्षा क्रमांक एमएच ४३ -एसी ६२४४) नेरूळ पूर्वेला शनी मंदिराजवळील रिक्षा स्टॅण्डवर रिक्षा घेवून प्रवाशांची प्रतिक्षा करत होते. एक प्रवासी रिक्षात बसल्यावर त्यांनी त्यास नेरूळ सेक्टर २३ येथील आयसीआयसीआय बॅकेजवळ सोडले. दहा मिनिटांनी त्यांच्या रिक्षात बसण्यासाठी दुसरा प्रवासी आला असता त्यांना रिक्षामध्ये पहिला प्रवासी सामान विसरून गेलेला आढळून आला. कलशेट्टी यांनी त्याची लगेचच आयसीआयसीआय बॅकेत शोधाशोध केली. बॅकेत कलशेट्टी यांना तो प्रवासी आढळून आला नाही. त्यावेळी त्यांना तो प्रवासी आपल्या मित्रासमवेत रिक्षामध्ये संभाषण करत असताना कॅरोल क्रोस्ट या इमारतीमध्ये जाणार असल्याचे सांगत होता, हे लक्षात आले. त्यांनी तात्काळ त्या इमारतीमध्ये धाव घेवून इमारतीच्या सुरक्षा रक्षकाकडे वर्णन करत तो प्रवासी आला असल्याची विचारणा केली. सामानातील पिशवीची तपासणी केली असता १३ हजार रूपये रोख रक्कम, आधार कार्ड, पॅन कार्डसह अन्य महत्वाची कागदपत्रे आढळून आली. त्या कागदपत्रांवर असलेल्या मोबाईलवर संपर्क साधून कलशेट्टी यांनी प्रवाशाला सामान विसरल्याची आठवण करून दिली. हा प्रवासी इशार्द पठाण असल्याचे कागदपत्रावरून समजले. पठाण तात्काळ इमारतीमधून खाली आल्यावर कलशेट्टी यांनी त्यांना ती रोख रक्कम व कागदपत्रे परत केली.
रिक्षाचालक कलशेट्टी यांच्या प्रामाणिकपणाबद्दल शिववाहतुक सेनेचे नवी मुंबई अध्यक्ष दिलीप आमले यांनी त्यांचा सत्कार केला. हा प्रामाणिक रिक्षाचालक आपल्या नवी मुंबई रिक्षा चालक मालक सेवाभावी संस्थेचा सदस्य असल्याचा आपणास अभिमान असल्याचे आमले यांनी यावेळी सांगितले. या सत्कार कार्यक्रमावेळी ह.भ.प किसनराव महाराज आमले, रिक्षा संघटनेचे उपाध्यक्ष सोपान जेजुरकर, विजय काऊतकर, बुध्दीप्रकाश आदी मान्यवर उपस्थित होते.