मुंबई : राज्य शासनाच्या सेवेतील जे अधिकारी उत्कृष्ट काम करतील, त्यांना मुख्यमंत्री सुकर्मी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यानुसार दर वर्षी १२ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव केला जाणार आहे. राज्य सरकार पुरस्कार व समारंभासाठी दर वर्षी पाच कोटी रुपये खर्च करणार आहे.
शासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाचा दर्जा सातत्याने उंचवण्यासाठी तसेच त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी या वर्षांपासून उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री सुकर्मी पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पात केली होती. त्यानुसार या वर्षांपासून ही योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांनी तसा शासन आदेश जारी केला आहे.
मंत्रालय, विभाग व जिल्हा स्तरावर वेगवेगळे पुरस्कार दिले जाणार आहेत. उद्दिष्टनिष्ठ व वैयक्तिकनिष्ठ अशा दोन निकषांवर कर्मचारी-अधिकाऱ्यांची पुरस्कारासाठी निवड केली जाणार आहे. कार्यालयातील उपस्थिती, कामाचा निपटारा, वक्तशीरपणा, सचोटी, गोपनीय अहवालातील प्रतवारी, कार्यालयातील वर्तणूक, संवाद कौशल्य, मसुदा कौशल्य, शासन नियमांसंदर्भात ज्ञानाची पातळी, निपक्षपातीपणा, निर्णय क्षमता, लोकांशी सौजन्यपूर्ण वागणूक, याचा विचार करुन पुरस्कारासाठी निवड केली जाणार आहे. या वर्षी १५ ऑगस्ट रोजी खास समारंभ आयोजित करुन मंत्रालय स्तरावर पुरस्कार दिले जाणार आहेत. पुढील वर्षांपासून सर्व स्तरावर पुरस्कार दिले जातील . २१ एप्रिल हा दर वर्षी नागरी सेवा दिन म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला जाणार आहे.