दिपक देशमुख
नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या घरामध्ये काम करणार्या नोकराने चौगुले यांच्या घरातील लॉकर तोडून अडीच लाख रुपयांच्या रोख रक्कमेसह ८६ तोळे वजनाचे दागिने असा सुमारे २७ लाख ४० हजारांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. अनुराग सिंग असे या नोकराचे नाव असून रबाले पोलिसांनी त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे. यापूर्वी विरेंद्र लगाडे शिवसेनेत शाखाप्रमुख असताना त्यांच्या इमारतीमधील नेपाळी वॉचमनने घरातील झाडांना पाणी घालण्याच्या बहाण्याने लगाडे यांचे घर साफ करण्याची घटना घडली होती.
महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले ऐरोली, सेक्टर-८ मधील यश पॅरेडाईज या इमारतीत राहण्यास असून ३० मार्च रोजी सायंकाळी ते कुटुंबासह कार्यक्रमानिमित्त बाहेर होते. यादरम्यान, चौगुले यांच्या घरामध्ये एकटाच असलेल्या नोकर अनुराग सिंग याने त्यांच्या घरातील लॉकर तोडून अडीच लाख रुपयांच्या रोख रक्कमेसह ८६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असा सुमारे २७ लाख ४० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. रात्री उशीरा चौगुले कुटुंबिय घरी परतल्यानंतर चोरीचा सदर प्रकार उघडकीस आला. त्यानंतर विजय चौगुले यांनी रबाले पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल केली. सदर तक्रारीनुसार चौगुले यांच्या घरी काम करणार्या अनुराग सिंग याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप तिदार यांनी दिली.
दरम्यान, आरोपी अनुराग सिंग मुळचा युपीतील असून तो त्याच्या मुळ गावी पळून गेला असण्याची शक्यता असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक वाराणसी येथे रवाना झाल्याचेही तिदार यांनी सांगितले.
सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कार्यरत असणारे नेरूळ पश्चिमचे विरेंद्र लगाडे महापालिका निवडणूकीपूर्वी शिवसेनेत शाखाप्रमुख होते. ते बाहेरगावी गेले असताना घरातील झाडांना पाणी घालण्यासाठी सोसायटीतील नेपाळी वॉचमनकडे चावी देवून गेले होते. घरातील झाडांना पाण घालण्याऐवजी त्या नेपाळी वॉचमनने लगाडेचे घरच साफ करत दागिने व रोख रक्कम असा तगडा ऐवज चोरून नेला होता.