संदीप खांडगेपाटील :- ८३६९९२४६४६ – ८०८२०९७७७५
नवी मुंबई :- नेरूळ नोडमध्ये बोगस रिक्षा चालकांचा सुळसुळाट झाल्याने परवानाधारक व खरी कागदपत्रे असणार्या रिक्षा चालकांच्या व्यवसायावर परिणाम होवून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. रिक्षा मालकांना अलीकडच्या काळात यामुळे रिक्षा ‘शीप’वर चालविण्याकरिता ड्रायव्हरही उपलब्ध होत नसल्याने शंभर-दोनशे शीप पाहिजे तर द्या पण आमची रिक्षा चालवायला घेवून जा असा टाहो फोडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नेरूळ नोडमधील रिक्षांवर नजर टाकली असता किमान तीनशेहून अधिक रिक्षा चालकांकडे वाहन चालविण्याचा परवाना तसेच अन्य कोणतीही कागदपत्रे नसल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.
रिक्षाचा बॅच व परमिट ओपन झाल्यापासून शीपवर चालविणारे ड्रायव्हरच आता रिक्षाचे मालक बनल्यापासून केवळ शीपवर धावणार्या अनेक रिक्षा रस्त्यावर उभ्या राहू लागल्या आहेत. बजाज व टीव्हीएस या दोन कंपनीच्या रिक्षा बाजारात धावत असून बजाजच्या रिक्षांकरिता प्रतिक्षा करावी लागते तर टीव्हीएसच्या रिक्षा तात्काळ उपलब्ध होत असल्याचे रिक्षा चालकांचे म्हणणे आहे.
नेरूळ नोडमध्ये रिक्षा जरी अधिकृत असल्या तरी त्या चालविणारे चालक मात्र मोठ्या संख्येने अपात्र व बोगस असल्याची चर्चा रिक्षा स्टॅण्डवर विविध ठिकाणी उघडपणे होवू लागली आहे. कोणतीही कागदपत्रे नसताना तसेच येथील परवाना नसतानाही रिक्षा चालविणारे चालक हे सर्रासपणे उत्तर भारतीय असल्याचे दिसून येत आहे. केवळ नेरूळ नोडमध्ये तीनशेहून अधिक चालकांकडे कोणत्याही प्रकारची कागदपत्रे व येथील रिक्षा चालविण्याचे परवाने नसल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून देण्यात येत आहे.
वाहतुक पोलीसांकडून तसेच आरटीओ अधिकार्यांकडून अशा रिक्षांवरिल चालकांच्या परवान्यांची व कागदपत्रांची तपासणी होत नसल्याने गेल्या काही महिन्यापासून अशा रिक्षाचालकांच्या संख्येत वाढ होवू लागली आहे. परवाना व बॅच असणार्या रिक्षाचालकांना या बोगस व अपात्र चालकांशी स्पर्धा करावी लागत असल्याने व्यवसायात अडचणी निर्माण झाल्या आहेत. वाहतुक यंत्रंणाच अशा चालकांप्रती कारवाई न करता बघ्याची भूमिका घेत असल्याचा सूर रिक्षा चालकांकडून आळविला जात आहे. कागदपत्रे व परवाने नसतानाही रिक्षा व्यवसायातील चालकांची वाढती संख्या पाहता नेरूळ नोडमध्ये वाहतुक यंत्रणा कोमात गेल्याचे व संबंधित चालक जोमात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.