संदीप खांडगेपाटील :- ८३६९९२४६४६ – ८०८२०९७७७५
नवी मुंबई :- परिसराचा विकास करताना आणि स्थानिक जनतेला नागरी सुविधा पुरविताना सातत्याने विकासकामे करावी लागतात. त्या विकासकामांचा दर्जा राखण्याची, विकासकामांमध्ये गुणवत्ता ठेवण्याची जबाबदारी ठेकेदाराची असते. कामामध्ये गुणवत्ता ठेवायची नसेल तर कामे करूच नका, असा सज्जड दम राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सुरज पाटील यांनी दिला.
नेरूळ सेक्टर सहामधील उद्यान व क्रिडांगणाच्या काही तक्रारी स्थानिक रहीवाशांकडून प्राप्त झाल्यावर नगरसेवक सुरज पाटील यांनी तात्काळ पालिकेच्या उद्यान अधिकार्यांना व काम सुरू असलेल्या ठेकेदारालाही उद्यानात बोलावून घेतले आणि समस्यांचा पंचनामा केला.
उद्यानातील झोपाळे तुटणे, सफाईतील अनियमितता, तुटलेले बाकडे, हायमस्टचा अंधुकसा प्रकाश यासह अन्य समस्यांचा पंचनामा यावेळी नगरसेवक सुरज पाटील यांनी ठेकेदार व पालिका अधिकार्यांसमोर केला. नगरसेवक म्हणून मी व जयश्री ठाकूर तसेच सुजाता पाटील सभागृहात नेरुळ सेक्टर सहा, सारसोळे गाव, कुकशेत गावाच्या विकासासाठी प्रयत्न करत आहोत. समस्या मांडत आहोत, सुविधांसाठी पाठपुरावा करत आहोत. उद्यानातील कचरा हटविता येत नसेल, पाणी मिळत नसेल तर याला जबाबदार कोंण, स्थानिक रहिवाशी पालिका अधिकार्यांना नाही तर नगरसेवकांना शिव्या घालतात. पालिकेच्या कामचुकारपणाची किंमत नगरसेवकांना चुकवावी लागत असल्याचा संतापही सुरज पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
विकासकामे करवून घेण्यासाठी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करावा लागतो. पालिका अधिकार्यांच्या टेबलाजवळ चपला झिजवाव्या लागतात. त्यानंतर अनेकदा फाईली गहाळ होतात. या अडथळ्याच्या शर्यतीतून विकासकामे मंजूर केल्यावर ती कामे विकासकामे चांगली होत नसतील त्या विकासकामांना अर्थच नाही, ती न झालेली परवडली, असे खडे बोल सुरज पाटील यांनी पालिका अधिकार्यांना व ठेकेदाराला सुनावले.
उद्यानात अनेकदा सफाई कर्मचारीच नसतो, उद्यानातील झाडांचा खाली पडलेला पालापाचोळा नियमितपणे उचलला जात नाही, उद्यानातील झाडांना पाणी वेळेवर भेटत नाही. उद्यानातील स्वच्छतेबाबत चालढकल केली जाते याबाबतही सुरज पाटील यांनी या पाहणी अभियानात आपला संताप व्यक्त केला.
उद्यान व क्रिडांगणाच्या कोपर्यावर अश्लिल प्रकार होवू लागल्याने नगरसेवक सुरज पाटील यांनी संबंधित पालिका उपायुक्तांना संपर्क साधून उद्यान व क्रिडांगणाला तात्काळ सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देण्यास सांगितले.
उद्यानातील तुटलेले बाकडे, ज्येष्ठांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था यासह माफक प्रकाश आदी सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे निर्देशही सुरज पाटील यांनी संबंधितांना दिले.
उद्यानातील समस्यांबाबत प्रभाग ८५च्या कार्यसम्राट नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी सातत्याने पालिका प्रशासनदरबारी आवाज उठविला आहे. मागील प्रभाग समितीच्या बैठकीत उद्यानात कामगार असतो का, काम करतो का याबाबत नगरसेविका सुजाताताई यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत संबंधितांना अहवाल सादर करण्यास सांगितले होते. सभागृहात सारसोळे गावासाठी तीन नगरसेवक कार्यरत असताना तेथील समस्यांसाठी प्रभाग समिती सदस्यांनाही पाठपुरावा लागतो यावरूनच महापालिका प्रशासनाच्या अकार्यक्षमतेविषयी नगरसेविका सुजाता पाटील यांनी संतप्त होत पालिका अधिकार्यांना खडे बोल सुनावले होते.