उद्याचा मोर्चा तूर्तास स्थगितः कांतीलाल कडू
पनवेल :- मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणार्या सिडकोला कचराप्रश्नी सामाजिक संस्थांनी आंदोलनाचा इशारा देताच, खडबडून जाग आली आहे. सिडको प्रशासनाने मोर्चाला सामोरे जाण्यापेक्षा कचर्याची विल्हेवाट लावणे पसंत करून तात्काळ कृती करण्यास सुरूवात केल्याने उद्या, मंगळवारी (दि. 3) सामाजिक संस्थांनी सिडकोला आंदोलनाचा इशारा दिला होता. तो तूर्तास स्थगित करण्यात आल्याची माहिती पनवेल संर्घष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी दिली आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रातील मालमत्ता हस्तांतरणाचा विषय अधांतरी असल्याने पायाभूत सुविधा पुरविण्याच्या कर्तव्याचा सिडकोला विसर पडत चालला आहे. त्याबाबत 23 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत पनवेल महापालिका क्षेत्रातील पायाभूत सुविधांची जबाबदारी सर्वस्वी सिडकोची असल्याचे सांगत व्यवस्थापकीय संचालक भूषण गगरानी यांचे खुद्द मुख्यमंत्र्यांनीच कान उपटले होते.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर कचराप्रकरणी सिडकोने टाळाटाळ केली होती. त्यामुळे सर्व शहरांमध्ये कचर्याचे ढिग साचल्याने सामाजिक संस्थांच्यावतीने मंगळवारी सिडकोवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. तसे निवेदन गगरानी यांना पाठविले होते. त्याची दखल नवी मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेनेही घेतली होती.
हाती आलेल्या विश्वसनिय वृत्तानुसार उद्याचा मोर्चा आणि एकंदरीत कचराप्रकरणी उपस्थित झालेला कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर पोलिस आयुक्तालयातील उच्च पदस्थ अधिकार्यांनीही सिडकोचे कान ओढले आहेत.
त्याशिवाय पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दोनच दिवसांपूर्वी सिडको अधिकार्यांशी चर्चा करून कचराप्रकरणी नागरिकांना वेठीस न धरण्याचे आवाहन केले. शिवाय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची आठवणही करून दिल्याने सिडको बर्यापैंकी वठणीवर आली आहे. शहरांतील कचरा उचलण्यास प्रारंभ केल्याने तूर्तास सामाजिक संस्थांचा नियोजित मोर्चा स्थगित करण्यात आल्याची माहिती कडू यांनी दिली आहे.