गुढीपाडवा म्हणजे काय ? तर लहानपणी गळ्यात घातलेली बत्ताशाची माळ, आई नि केलेली श्रीखंड पुरी आणि बाबांनी उभारलेली सुंदर आकर्षक गुढी… मराठी नववर्षाची सुरवात!
देश सोडून परदेशात स्थायिक झाल्यावरदेखील मराठी संस्कृती,परंपरा,कला यांचा आस्वाद घेता यावा आणि हा संपन्न वारसा आपल्या पुढच्या पिढीलादेखील मिळावा म्हणून इंग्लंडच्या कॉव्हेन्टरी शहरातील ‘मराठी कॉव्हेन्टरी’ मंडळातर्फे सालाबादप्रमाणे यावर्षीदेखील गुढीपाडवा अतिशय उत्साह आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा केला. कॉव्हेन्टरी आणि आसपासच्या शहरातील लहानथोर अशी २०० हून अधिक मराठी मंडळी यानिमित्ताने एकत्र आली. ‘गर्जा महाराष्ट्र’ या नावाने साजरा झालेला हा दिमाखदार सोहळा , मातृभूमीपासून दूर असूनही या मराठीजनांची मराठी भाषा, कला आणि संस्कृती याच्याशी असलेली नाळ किती घट्ट आहे हे दाखवणारा ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात अतिशय देखण्या अशा शोभायात्रेने झाली. शोभायात्रेत सगळ्यात पुढे नववारी साडीत लेझीम खेळणाऱ्या महिला, भगवा ध्वज घेतलेले महाराष्ट्रीय वेशभूषेतील पुरुष , त्यामागे खास बर्मिंगहॅम येथून सहभागी झालेल ‘ढोलड्रम्स’ हे ढोलपथक आणि शेवटी ज्यांच्या नावे महाराष्ट्र जगभर गौरवला जातो अशा थोर व्यक्तींच्या वेशभूषेत ‘मराठी कॉव्हेन्टरी’चे सदस्य चालत होते.
शोभायात्रेनंतर गाण्यांच्या सुरेल मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. गाण्यांची योग्य निवड आणि सुमधुर आवाजात सादर केलेल्या या मैफीलने उपस्थितांची मने जिंकली.
गाण्याच्या मैफिलीनंतर विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम होता. यात वैयक्तिक आणि सामूहिक नृत्यप्रकार सादर केले गेले. यात देखील लहान थोरांनी उत्साहपूर्ण सहभाग घेतला. मराठी विविध कलाप्रकारांचा यात सहभाग होता.
यासोबतच एका ‘गर्जा महाराष्ट्र’ या संकल्पनेवर आधारित एका कलाप्रदर्शनाचे देखील आयोजन केले गेले होते, ज्याला उपस्थितांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. HDFC होम फायनान्स आणि ड्रीम मर्चण्ट सर्विसेस यांनी या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व केले.
अप्रतिम कार्यालय,नेटके आयोजन आणि ‘मराठी कॉव्हेन्टरी’ मंडळाच्या सदस्यांचा उत्साही सहभाग यामुळे हा गुढीपाडव्याचा कार्यक्रम अतिशय छान पार पडला.