पनवेल :- महापालिका क्षेत्रातील देवीचा पाडा आणि पाले खुर्द विभागातील नागरी समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले जाईल. तेथील सांडपाण्याचा निचरा नदीत केला जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यासंदर्भात आज संध्याकाळी संबंधित अधिकार्यांकडून अहवाल मागविला गेला. त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला दिले.
सामाजिक कार्यकर्ते तथा पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली देवीचा पाडा, पाले खुर्द येथील पन्नासहून अधिक ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. शिंदे यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. त्यावेळी शिंदे यांनी संबंधित अधिकार्यांना तात्काळ निर्देश देत समस्यांचे निराकरण करण्यास सांगितले.
शिष्टमंडळात काका कडू, संतोष कांबळे, राजेश देशेकर, महादेव घाहास, दत्तात्रेय पाडेकर, सोपान पाटील, राकेश गायकवाड, रमेश पाटील, सुरेश पाटील, सुरज सोनावणे, धिरज, पाटील दिलीप देशेकर, संतोष गडगे, यशवंत कदम, प्रविण मानकामे, जगदिश कोपरकर, नामदेव पाटील, सुरेश पाटील, अंकुश गडगे, रमण कदम, बाळकृष्ण आदईकर, संतोष ठोंबरे, सुरेश जगे, गुरुनाथ पाटील, सोपान कडू, नारायण पाटील, रामचंद्र पाडेकर, महेश म्हात्रे, भालचंद्र गडगे, रमेश कुंभारकर, विलास पाटील, पनवेल पंचायत समिती सदस्य अरुण देशेकर, अनंता कडू, गणपत कडू, मधुकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य कुंडलिक देशेकर आदींचा समावेश होता.
पाले येथील शाळेसमोर चुकीच्या पद्धतीने गतिरोधक टाकण्यात आल्याने ते अपघात प्रवण क्षेत्र झाले आहे. रस्ता ओलांडणार्या विद्यार्थ्यांसह पादचारी आणि दुचाकीस्वारांना अनेकदा अपघातातून जायबंद व्हावे लागले असल्याचे संतोष कांबळे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी काही अपघातांचे छायाचित्र दाखवून गंभीर परिस्थितीची जाणीव करून दिली. त्यावर महापालिकेचे शहर अभियंता सुधीर कटेकर यांना त्वरीत आदेश देवून त्या गतिरोधकांविषयी उचित निर्णय घेण्यास आयुक्तांनी सुचविले.
देवीचा पाडा आणि पाले परिसरातील नागरिकांना नदीच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा लागतो, परंतु, तेथील विनायक आणि अल्फा गृहनिर्माण सोसायटीने त्यांच्या सांडपाण्याचा निचरा नदीत केल्याने पाणी दुषित झाले आहे. शिवाय ते सांडपाणी जमिनीत मुरत असल्याने बोअरवेलच्या पाण्यावरही विपरित परिणाम झाल्याची तक्रार माजी सरपंच काका कडू यांनी डॉ. शिंदे यांच्याकडे केली.
शुक्रवार आणि रविवारच्या बाजारपेठेमुळे होणारी वाहतुक कोंडी गंभीरस्वरूपाची असल्याने कित्येक वेळा प्रकरण हातघाईवर येत असतात. रस्त्याच्या दुतर्फा मांडली जाणारी अवैध बाजारपेठ आणि अतिक्रमणे वाहतुक कोंडीला कारणीभूत ठरत असल्याचे नागरिकांनी ती समस्या अधिक तीव्र बनल्याचे सांगताच, डॉ. शिंदे यांनी विभागीय अधिकारी घांग्रे यांना रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले. त्याशिवाय अवैध बाजारपेठेवर कारवाई करण्याचेही निर्देश दिले.
*****
पंधरा दिवसात रस्त्याच्या दुरूस्तीला सुरूवात
देवीचा पाडा ते पाले येथील रस्त्याचे काम गेली अनेक वर्षे रखडले असल्याने नागरिकांची मोठी कुंचबणा होत आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याचे विभागीय अभियंता नरेश पवार यांची शिष्टमंडळाने भेट घेतली, असता त्या कामाची पुर्ननिविदा काढण्यात आली असून येत्या पंधरा दिवसात कामाला प्रत्यक्षात सुरूवात केली जाईल. देवीचा पाडा येथील क्रॉक्रिट रस्त्याचे ५० लाखाचे तर पाले येथील डांबरीकरणाचे काम ४६ लाखाचे आहे. पावसाळ्यापूर्वी दोन्ही कामे लोर्कापण केली जातील.
-नरेश पवार
(विभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम खाते)