प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांची माहिती
मुंबई – भारतीय जनता पार्टीच्या ६ एप्रिल रोजी होणाऱ्या महामेळाव्यासाठी राज्यभरातून पक्षाचे किमान तीन लाख कार्यकर्ते उपस्थित राहणार असून या मेळाव्यानंतर कार्यकर्ते नव्या उमेदीने कामाला लागतील व पक्षाला यश मिळवून देतील, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी बुधवारी सांगितले.
खा. रावसाहेब पाटील दानवे मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशिष शेलार, प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, प्रदेश उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड, महिला मोर्चा अध्यक्ष ॲड. माधवी नाईक, प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, प्रवक्ते केशव उपाध्ये, अतुल शाह व गणेश हाके उपस्थित होते.
खा. रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचा ६ एप्रिल स्थापना दिवस आहे. त्यासाठी आयोजित केलेल्या महा मेळाव्यास राज्यातील तीन लाख कार्यकर्ते मुंबईत दाखलहोणार आहेत. सभेला संबोधित करण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह येणार असून मुख्यमंत्री देवेद्रजी फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेचपक्षाचे राज्यातील केंद्रीय मंत्री,प्रभारी, सहप्रभारी उपस्थित राहणार आहेत.
त्यांनी सांगितले की, १९८० साली मुंबईत भाजपाची वाटचाल सुरु झाली. 2013 साली डिसेंबरमध्ये याच परिसरात भाजपाची विराट महागर्जना रॅली झाली आणि परिवर्तन घडले. स्थापना दिनाच्या विराट महामेळाव्यानंतर भाजपा कार्यकर्ते नव्या जोमाने कामाला लागतील व पक्षाला यश मिळवून देतील.
त्यांनी सांगितले की, राज्याच्या विविध भागामधून मुंबईकडे येण्यासाठी कार्यकर्त्यानी जय्यत तयारी केली आहे. भाजपाचे विराट स्वरुप मुंबईत बघायला मिळणार, म्हणून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. राज्यातून २८ रेल्वेगाडयांनी कार्यकर्ते मुंबई दाखल होणार आहेत तसेच बसेस, जीप, कार इत्यादी पन्नास हजार गाड्यांनीकार्यकर्ते येणार आहेत. मुंबईत येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या व्यवस्थेसाठी मा. आशिष शेलार आणि त्यांची टीम काम करत आहे.
ते म्हणाले की, मेळाव्याच्या ठिकाणी तीन लाख कार्यकर्ते बसतील एवढा भव्य मंडप, प्रमुख मार्गदर्शक यांच्या व्यासपीठाच्या व्यतिरिक्त आमदार, खासदारांसाठी आणि पदाधिकाऱ्यासाठी दुसरे व्यासपीठ केले आहे. महिलांना थांबण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. कुर्ला,बांद्रा,सीएसटी, लोकमान्य टिळक टर्मीनस या ठिकाणी स्टॉल उभारण्यात येणार असून तेथून कार्यकर्त्यांना सभास्थळी नेआण करण्याची व्यवस्था केली आहे.
आ. आशिष शेलार म्हणाले की, महामेळाव्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे गुरुवारी सायंकाळी मुंबईत आगमन होईल. विमानतळापासून त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत युवामोर्चाचे कार्यकर्ते बाईक रॅली काढून त्यांचे स्वागत करणार आहेत. शुक्रवारी महामेळाव्यास संबोधित केल्यानंतर मा. राष्ट्रीय अध्यक्षांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी पक्षाच्या आमदार खासदारांची बैठक होणार आहे.