नवी मुंबई :- सुनियोजित शहर हा नवी मुंबईचा नावलौकीक कायम रहावा यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे या विरोधात महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या निर्देशानुसार सर्वच विभाग कार्यालय क्षेत्रात धडक कारवाई करण्यात येत असून बेलापूर, घणसोली व कोपरखैरणे येथील अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई करण्यात आली.
यामध्ये बेलापूर विभाग कार्यालय क्षेत्रांतर्गत से. 15 येथील भूखंड क्रमांक 61 कबाना हॉटेल यांनी केलेले अनधिकृत वाढीव बांधकाम निष्कासीत करण्यात आले. या हॉटेलमध्ये मागील बाजूस अनधिकृत वाढील किचन व लॉफ्ट असे एकूण 500 चौ.फूट बांधकाम करण्यात आले होते. सदर वाढीव अनधिकृत बांधकामास महाराष्ट्र नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 53(1) अन्वये रितसर नोटीस बजावण्यात आली होती. त्या विरोधात संबंधितांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. सदर निकाल नवी मुंबई महानगरपालिकेच्या बाजूने लागल्याने अतिरिक्त आयुक्त श्री. अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार, अतिक्रमण विभागाचे उप आयुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे यांच्या नियंत्रणाखाली, बेलापूर विभागाचे विभाग अधिकारी श्री. शशिकांत तांडेल यांनी विभागातील सहकारी अधिकारी-कर्मचारी यांच्या सहयोगाने ही धडक कारवाई केली. या कारवाईत 1 जेसीबी, 7 मजुरांसह बेलापूर विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच अतिक्रमण विभागाचे पोलीस पथक तैनात होते. या मोहीमेत कारवाईपोटी रु. 50 हजार इतकी रक्कम दंड स्वरुपात वसुल करण्यात आली.
अशाचप्रकारे घणसोली विभाग कार्यक्षेत्रामधील कैलास नाईक यांनी बांधलेली घुंघट नगर येथील चार मजली अनधिकृत इमारत तसेच दलुभाई जगदाळे राबाडागांव यांची 1 मजली आर.सी.सी. अनधिकृत इमारत त्याचप्रमाणे दत्ता पाटील यांची दोन मजली आर.सी.सी. इमारत अशा तीन अनधिकृत बांधकामांना महाराष्ट्र नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये रितसर नोटीस बजावण्यात आली होती. परंतू त्यांनी सदर अनधिकृत बांधकाम स्वत: न काढल्याने या तिन्ही अनधिकृत बांधकामांवर घणसोली विभागाचे सहा. आयुक्त श्री. दत्तात्रय नागरे यांनी विभागातील सहकारी अधिकारी-कर्मचारी यांच्या सहयोगाने बांधकाम निष्कासनाची धडक कारवाई केली. या कारवाईत 2 ब्रेकर, 2 गॅस कटर, 15 मजुरांसह अतिक्रमण विभागाचे पोलीस पथक तैनात होते.
कौपरखैरणे विभाग क्षेत्रातही अशीच अतिक्रमण विरोधी मोहीम कोपरखैरणे विभागाचे सहा. आयुक्त श्री. अशोक मढवी यांच्या नियंत्रणाखाली विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यामार्फत राबविण्यात येऊन सेक्टर 06 येथील एस.एस. टाईप रुम नं.565, 563 येथे घरमालकाने केलेले वाढीव अनधिकृत बांधकाम तोडून टाकण्यात आले. या अनधिकृत बांधकामास महाराष्ट्र नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. परंतू या नोटिशीची दखल घेऊन संबंधितांनी हे अनधिकृत बांधकाम स्वत:हून निष्कासीत न केल्याने अतिक्रमण विभागाने त्याच्यावर हातोडा मारला. या कारवाईत 1 ब्रेकर, 1 गॅस कटर, 15 मजुर तसेच अतिक्रमण विभागाचे पोलीस पथक उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अशाप्रकारच्या अतिक्रमण विरोधी धडक मोहीमा यापुढील काळात महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनानुसार राबविल्या जाणार आहेत.