सुजित शिंदे :- ९६१९१९७४४४
नवी मुंबई :- सारसोळे जेटीवर पाण्याचा नळ उपलब्ध करून देण्याची मागणी महापालिका ‘ब’ प्रभाग समिती सदस्य आणि सारसोळे गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर यांनी महापौर जयवंत सुतार, महापालिका आयुक्त आणि नेरूळ विभाग अधिकारी यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
पामबीच मार्गालगत सारसोळेची जेटी आहे. नेरूळ विभाग कार्यालयातर्ंगत महापालिका कार्यक्षेत्रात सारसोळे गाव आहे. नवी मुंबईच्या विकासाकरिता सारसोळे गावच्या ग्रामस्थांचे योगदान व बलिदान शब्दांतही सांगता येणार नाही. शहराच्या विकासाकरिता झालेल्या भुसंपादनात सारसोळेच्या ग्रामस्थांना आपली भातशेती गमवावी लागली आहे. सारसोळेच्या ग्रामस्थांना आता खाडीतील मासेमारीवर आपली उपजिविका करावी लागत आहे. भरती-ओहोटीचे गणित सांभाळत दिवसा-उजेडी, दुपारी तसेच रात्री-मध्यरात्री अगदी पहाटेही सारसोळेच्या ग्रामस्थांना खाडीत मासेमारीसाठी जावे लागते. भरतीचे पाणी जेटीपर्यत येत नसल्याने खाडीत पकडलेले मासे घेवून जेटीपासून काही अंतरावरच आपल्या लहान होड्या उभ्या करून गाळ-चिखल तुडवित ग्रामस्थांना जेटीपर्यत यावे लागते. त्यात जेटीवर पाण्याची सोय नसल्याने चिखलाने व गाळाने माखलेलेे पाय घेवून पामबीच मार्ग ओंलाडून सारसोळे गावात आपल्या घरी आल्यावर ग्रामस्थांना हात पाय धुवावे लागत असल्याचे सारसोळे गावचे विकासपर्व म्हणून नवी मुंबईत ओळखल्या जाणार्या मनोज मेहेर यांनी निवेदनात म्हटले आहे,
खाडीतील गाळाने व चिखलाने माखलेले पाय घेवून गेल्यामुळे सारसोळेच्या अनेक ग्रामस्थांना आजाराचा तसेच शारीरीक व्याधीचा सामना करावा लागला आहे. विकसित झालेल्या नवी मुंबईकरांना मोरबेमुळे एकीकडे २४ तास मुबलक पाणी उपलब्ध होत असताना दुसरीकडे नवी मुंबई महापालिका प्रशासनाने मुळ भूमीपुत्र असलेल्या सारसोळेच्या ग्रामस्थांना अद्यापि जेटीवर पाणी उपलब्ध करून दिलेले नाही. जेटीवर महापालिका प्रशासनाने पाण्याचा नळ उपलब्ध करून दिल्यास ग्रामस्थ जेटीवरच हात-पाय धुवून गावातील आपल्या घरी येतील. समस्येचे गांभीर्य लक्षात घेता महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर सारसोळे जेटीवर पाण्याचा नळ उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मनोज मेहेर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.