संघर्षच्या गुटखामुक्त संकल्पाला कोट्यावधीच्या कारवाईचा सलाम
पनवेल :- अन्न व औषध प्रशासनाने गुटखा विक्रेत्यांच्या नांग्या ठेचण्याची मोहिम तीव्र केल्यानं काल पुन्हा सुकापूर परिसरात एका वाहनातून सव्वा लाखाचा गुटखा त्यांच्या पथकाने पोलिसांच्या सहाय्याने हस्तगत केला. त्यांनी या कारवाईत चार चाकी वाहनही हस्तगत केले आहे. संघर्ष समितीने गुटखा मुक्त रायगडचा संकल्प केल्यापासून गेल्या तीन महिन्यात 59 लाखाचा गुटखा तर हस्तगत केलेल्या आठ वाहनांच्या किंमत 36 लाख असल्याने आतापर्यंत कोटी रूपयांच्या घरात ही कारवाई गेली आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त दिलीप संगत यांनी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांना दिली आहे.
राधेश्याम हनमंतप्रसाद गुप्ता हा गुटखा विक्रीतील प्रमुख दलालांपैंकी एक असलेला त्याच्या वाहनातून मोठ्या प्रमाणात गुटखा घेवून जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाल्याने त्यांनी खांदेश्वर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक योगेश मोरे यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या पोलिस पथकासह सुकापूर भागात सापळा रचला.
राधेश्यामची गाडी येताच ती अडवून तपासणी केली असता त्यामध्ये 1 लाख 28 हजार 298 रूपयांचा विविध कंपन्यांचा अवैध गुटखा आढळून आला. छोटा हत्ती प्रकारातील वाहनाची किंमत 90 हजार असल्याने ही कारवाई सव्वा दोन लाखापर्यंत गेली आहे.
दरम्यान, प्रथमतःच इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई होत असल्याने तरूणांना व्यसनाधिनतेपासून रोखण्याचे सत्कार्य करणार्या पनवेल संघर्ष समितीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जानेवारीच्या प्रारंभीच संघर्ष समितीने गुटखा मुक्त पनवेल, गुटखा मुक्त रायगडचा संकल्प करून अन्न व औषध प्रशासनासह पोलिस अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, पंचायत समिती आदींची शासकीय विश्रामगृहात तातडीची बैठक घेतली होती. अन्न व औषध प्रशासनाचे कोकण विभागीय आयुक्त सुरेश देशमुख यांनी संघर्षच्या मागणीनुसार मोहिम तीव्र करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता करताना गेल्या तीन महिन्यात 59 लाख 44 हजार 144 रूपयांचा गुटखा जप्त करून त्यांच्यावर न्यायालयीन खटले दाखल केले आहेत. तसेच आठ वाहने विविध कारवाईतंर्गात जप्त केली आहेत. त्यांची किंमत 36 लाख 24 हजार 802 रूपये असल्याची माहिती एका अहवालाद्वारे संघर्ष समितीला प्रशासनाने आज दिली असल्याची माहिती कांतीलाल कडू यांनी दिली आहे.
या कारवाईत खांदेश्वर पोलिसांच्या पथकासह अन्न व औषध सुरक्षा अधिकारी बालाजी शिंदे व सुप्रिया जगताप यांनी सहभाग घेतला होता.