पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांचे प्रतिपादन
पनवेल :- देशाचे संरक्षण करताना सीमेवर धारातीर्थ पडलेल्या जवानांना कोरड्या शब्दांनी श्रद्धांजली अर्पण करणार्या सरकारने डोके खाजवून त्यांच्यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. काही राज्यात आजी, माजी सैनिकांसाठी मालमत्ता करात पूर्णतः सुट देण्यात आली आहे, दूर्दैवाने तो निर्णय महाराष्ट्र सरकार अद्यापही घेवू शकलेला नाही, अशी खंत व्यक्त करून सैनिक आणि त्यांच्या नातेवाईकांच्या पालकत्वाची जबाबदारी सरकारने उचलावी, असे प्रतिपादन पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केले.
उलवे नोडमधील मशाल सामाजिक सेवा संस्थेच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त साईनगर, वहाळ येथील श्री साईनाथ मंदिराच्या प्रांगणात आयोजित केलेल्या कार्यक्रमातून आजी, माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
आंध्रप्रदेश, छत्तीसगड, हरियानासारख्या राज्यात आजी, माजी सैनिकांना मालमत्ता करात पूर्णतः सुट देण्यात आली आहे. तेथील सरकार सैनिकांबाबत सजग आहे. महाराष्ट्र सरकारला अद्याप ती सुबुद्धी सुचत नाही असे सांगून कडू म्हणाले की, त्या राज्यांकडून काही बोध घेवून राज्य व केंद्र सरकारने सैनिकांसाठी ठोस निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
देशातील आजी, माजी सैनिकांसाठी प्रत्येक राज्यात रूग्णालये आहेत. परंतु, तिथेही त्यांची ससेहोलपट होत आहे. त्यांच्या पाल्यांसाठी सरकारने शिष्यवृत्ती योजना देवून त्यांच्या उच्च शिक्षणाची जबाबदारीही घेतली पाहिजे, असे मत व्यक्त केले.
देशाच्या सीमा सुरक्षित आहेत, असे म्हणताना सैनिकांच्या रक्ताचा रोज होणारा अभिषेक अस्वस्थ करणारा आहे. त्यांचे बलिदान वाया जाऊ न देण्याची सरकारची मानसिकता असेल तर सर्जिकल स्ट्राईकचे गुणगाण गाण्यापेक्षा आजी, माजी सैनिकांना ऊर्जा देण्यासाठी त्यांच्या कुटूंबाची जबाबदारी पालक म्हणून केंद्र अथवा संबंधित राज्यातील सरकारने स्वीकारणे महत्वाचे ठरणार असल्याचा दावा कडू यांनी केला.
पारतंत्र्याची जळमटं काढून टाकताना ज्यांनी ज्यांनी प्राणाची आहुती दिली, त्यांच्यात परमेश्वरी अंश होता. आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके असतील, लोकमान्य टिळक असो की, अलिकडच्या काळातील डॉ. राम भोसले यांना साक्षात अवतारी महापुरूषांचे दर्शन घडले होते. त्यांना मिळालेल्या अध्यात्मिक अनुभूतीमुळे देशाचा कायापालट करून ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिल्याचा दाखलाही याप्रसंगी कडू यांनी दिला.
सैनिकांच्या त्यागाचे मोल शब्दात मांडू शकणार नाही, तर त्यांच्या ऋृणात कायमचे राहण्यास आवडेल, असे मत श्री साई संस्थानचे विश्वस्त रविशेठ पाटील यांनी मांडले.
मशाल सामाजिक सेवा संस्थेने आजी, माजी सैनिकांना त्यांच्या कुटूंबासह गौरविल्याने आपल्याला आनंदाचे भरते आले असल्याची कृतज्ञता पाटील यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक माणूस स्वतःला कशात तरी गुरफटून घेत आहे. त्याही स्थितीत समाजाचे भान असणार्या काही संस्था आणि सैनिकांसारख्या योद्यांचे दर्शन जेव्हा घडते, तेव्हा त्यांच्यातील अनामिक ऊर्जा आपल्याला मिळते, असेही पाटील यांनी सांगून सैनिकांना कडक सलाम ठोकला.
नवी मुंबईच्या नगरसेविका भारती कोळी, रविंद्र कासूकर, संस्थेचे अध्यक्ष पदाजी कासूकर, नंदकुमार ठाकूर आदींची यथोचित भाषणे झाले.
व्यासपिठावर ज्येष्ठ गायक निवृत्तीबुवा चौधरी, हभप पारिंगे, बाळारामशेठ पाटील, गव्हाणच्या सरपंच जिज्ञासा कोळी, वहाळचे उपसरपंच रामदास नाईक, मो. का. मढवी आदी उपस्थित होते.