नवी मुंबई :- विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण मिळावे, गावातील शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थीही हायटेक व्हावे, याकरिता बेलापूर गावातील सर्वात जुन्या असलेल्या विद्या उत्कर्ष मंडळाच्या विद्याप्रसारक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शाळेला आमदार निधीमधून दिलेल्या 11 कम्प्युटर व 6 प्रिंटरचे वाटप व उदघाटन समारंभ नुकताच बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी विद्या उत्कर्ष मंडळाचे संस्थापक पंढरीनाथ पाटील, अध्यक्ष भालचंद्र कोळी, सभापती महादेव पाटील, मुख्याध्यापक सोनावणे सर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका गायके मॅडम उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देणेकरीता शाळेत संगणकीय शिक्षणाचे वर्ग सुरु करणेकरिता बेलापूर गावातील विद्या उत्कर्ष मंडळाच्या विद्याप्रसारक हायस्कूल शाळेच्या संचालकांनी बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांजकडे संगणके पुरविण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता माझ्या आमदार निधीमधून आपल्या शाळेला संगणके देण्यात येण्याचे आश्वासन आमदार मंदाताई म्हात्रे यांनी संचालकांना दिले होते. याच अनुषंगाने आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सदर शाळेला त्यांच्या आमदार निधीतून 11 संगणक व 6 प्रिंटर वाटप करण्यात आले तसेच सदर कार्यक्रमाचा उदघाटन सोहळा पार पडला….
यावेळी विद्या उत्कर्ष मंडळाचे संस्थापक श्री. पंढरीनाथ पाटील यांनी सांगितले कि, आमदार मंदाताई म्हात्रे या कार्यसम्राट आमदार असून त्यांचे काम मी गेले 30 वर्षापासून पाहत आहे. त्यांनी आजपर्यंत केलेले कार्य खरंच खूप कौतुकास्पद असून त्यांच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामे पूर्ण झालेली आम्ही पाहिलेली आहेत. त्यांच्याकडे कोणत्याही कामासाठी गेले असता आम्हाला कधीही नकारात्मक उत्तर मिळाले नसल्याचेही त्यांनी सांगितले. आमच्या शाळेला कम्प्युटर व प्रिंटर दिल्याबद्दल तसेच बेलापूर गावातील हॉस्पिटल साठीही आमदारनिधीतून यंत्रसामुग्री व रुग्णवाहिकेची सुविधाही उपलब्ध केल्याबद्दल त्यांनी विद्या उत्कर्ष मंडळातर्फे आमदार मंदाताई म्हात्रे यांचे आभार मानले.
आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, बेलापूर गावातील विद्याप्रसारक हायस्कूल ही ठाणे बेलापूर पट्टीतील सर्वात जुनी शाळा असून या शाळेतून अनेक विद्यार्थी घडलेले आहेत. या शाळेतून घडलेले अनेक विद्यार्थी उद्योगपती, डॉक्टर, वकील यांसारख्या विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करीत आहेत. या शाळेने आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करण्याची माझी इच्छा असून लवकरच या शाळेची नवी शाखा आपल्याला अभिमान वाटेल अशी आंतरराष्ट्रीय दर्जाची निर्माण करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्वात जुन्या असलेल्या बेलापूर गावातील या शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण मिळावे, गावातील शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थीही हायटेक व्हावे याकरिता शाळेला संगणक व प्रिंटर वाटप करताना आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. या शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देताना शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांचेही आमदार मंदाताई म्हात्रे यांनी कौतुक केले.
यावेळी पांडुरंग कोळी, शैलजा पाटील, नामदेव पाटील, डॉ. निराळे, मोहन मुकादम, रुपेश दिवेकर, रेहमान धुरू, संदेश पाटील, दिलीप वैद्य, रियाझ, विज्ञान म्हात्रे, आर.आर.पाटील आशा बहाडकर तसेच शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.