नवी मुंबई – महानगरपालिकेने सन 2017-18 च्या अर्थसंकल्पामध्ये अपेक्षित धरलेल्या एकूण उत्पन्नाचे लक्ष्य साध्य केल्याने व त्यामधून दर्जेदार नागरी सेवा-सुविधा परिपूर्ती केली असल्याने सन 2017-18 चा अर्थसंकल्प वास्तववादी असल्याचे अधोरेखीत झाले आहे.
त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेस ‘इंडिया रेटींग ॲण्ड रिसर्च’ या देशातील मान्यताप्राप्त संस्थेच्या वतीने “डबल ए प्लस स्टेबल (AA+ Stable)” हे पत मानांकन यावर्षीहीजाहीर झाले असून असे मानांकन सातत्याने चौथ्या वर्षी मिळविणारी नवी मुंबई ही देशातील एकमेव महानगरपालिका आहे. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी महसूलाच्या बाबींकडे विशेष लक्ष देतानाच नागरिकांना उत्तम दर्जाच्या नागरी सुविधा मिळतील ही लोकाभिमुख दृष्टिकोन जपण्याकडे काटेकोर लक्ष दिल्याने ही उद्दिष्टपूर्ती साध्य झाली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सन 2017-18 वर्षाचा अर्थसंकल्प रू. 2987 कोटी रूपयांचा अपेक्षित केला होता, त्यामध्ये रू. 2950 कोटी इतकी एकूण जमा झाली आहे. त्यापैकी रू. 1962 कोटी इतके उत्पन्न विविध करांपोटी प्राप्त झाले आहे. यात नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थानिक संस्था कर / उपकर, मालमत्ताकर, नगररचना, पाणीपुरवठा विभागांनी सन 2017-18 या आर्थिक वर्षात कर वसुलीची अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेत उत्तम कामगिरी केल्याने नवी मुंबई महानगरपालिकेची आर्थिक स्थिती अधिकच सक्षम झालेली आहे.
यामध्ये स्थानिक संस्था कर / उपकर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा मोठा स्त्रोत असून या करांना पर्यायी केंद्रीय वस्तू सेवा कर प्रणाली सरकारमार्फत लागू केली असतानाही या करांच्या थकबाकी वसूलीकडे विभागाने विशेष लक्ष देत तसेच या करांपोटी महानगरपालिकेस मिळणारे शासकीय अनुदान लक्षात घेता सन 2017-18 मध्ये रू.1195 कोटी इतकी रक्कम प्राप्त झाली आहे. त्याचप्रमाणे मालमत्ताकरापोटी रू. 537 कोटी इतकी जमा झाली आहे. नगररचना शुल्कापोटी रू. 100 कोटी इतके उत्पन्न प्राप्त झाले असून पाणीपट्टीपोटी रू. 75 कोटी इतकी रक्कम प्राप्त झाली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेस विविध करांव्दारे प्राप्त होणा-या निधीमधूनच नागरी सुविधांची परिपूर्ती केली जात असल्याने नवी मुंबईकर नागरिकांना अधिक दर्जेदार सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देणे सहजशक्य झाले आहे. यावर्षी अडथळाविरहित पदपथ-रस्ते, रूग्णालय सुविधा पूर्तता, शैक्षणिक सुविधा व गुणवत्ता विकास, स्मशानभूमी अशी वेगवेगळी व्हिजन हाती घेऊन त्यानुसार प्राधान्य लक्षात घेऊन नागरी सुविधा कामे सुरू करण्यात आली. विविध लोकोपयोगी योजना-उपक्रम राबविण्यात आले. 17 वर्षाखालील ‘फिफा’ जागतिक फुटबॉल स्पर्धेच्या यजमानपदाचा बहुमान तसेच ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण 2018’ ला सामोरे जाताना शहर स्वच्छता व शहर सुशोभिकरणावर भर देत शहराचे बदललेले रूप अशी वैशिष्ट्यपूर्ण कामे करण्यात आली.
महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनानुसार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा मालमत्ता कर विभागाचे प्रमुख श्री. धनराज गरड आणि त्यांच्या अधिकारी-कर्मचारी समुहाच्या वतीने नियमित करवसूलीप्रमाणेच थकीत करवसूलीवर विशेष लक्ष देण्यात आले होते. त्याकरीता अधिकारी/ कर्मचारी यांची पथके तयार करून त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून देण्यात आली होती. त्याचा परिणाम महसूल वाढीवर झाल्याचे दिसून येत आहे.
मागील दीड वर्षांपासून नवी मुंबई महानगरपालिकेत ‘होस्ट टू होस्ट’ या अभिनव प्रणालीव्दारे देयके व रक्कमा अदायगी होत असून महानगरपालिकेचे कोणतेही पेमेंट पुरवठादाराच्या थेट बँक खात्यात जमा होत आहे. त्यामुळे कोणासही आपल्या पेमेंटसाठी महानगरपालिका कार्यालयात येण्याची गरज भासत नाही. याव्दारे कामकाजात पारदर्शकता आली असून पेपरलेस व गतीमान प्रशासन प्रभावीपणे राबविले जात आहे. त्याचप्रमाणे कंत्राटदारांचे पेमेंट व महापालिका कर्मचा-यांचे पगारही वेळेवर होत आहेत. याशिवाय नवी मुंबई महानगरपालिकेकडे महाराष्ट्र शासन, एम.एम.आर.डी.ए., एम.आय.डी.सी. यापैकी कोणाचेही थकीत कर्ज, व्याज अथवा कर बाकी नाही.
सन 2016-17 मध्ये रू. 1838 कोटी इतके महानगरपालिकेचे उत्पन्न होते, त्यामध्ये सन 2017-18 मध्ये 125 कोटींनी वाढ होत सन 2017-18 चे उत्पन्न 1962 कोटी इतके झाले. त्यामध्ये महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली जमेच्या तुलनेत नागरिकांना उपयोगी अशा नागरी सुविधांवरील योग्य खर्च यामुळे सन 2017-18 चा अर्थसंकल्प वास्तववादी असल्याचे सिध्द होतानाच सक्षम आर्थिक स्थितीमुळे नवी मुंबई महानगरपालिकेस ‘फिच’ या नामांकीत संस्थेमार्फत “AA+ Stable” हे पत मानांकन सातत्याने चौथ्या वर्षी लाभले आहे.