मुंबई : अवयवदानासंदर्भात जनजागृती व्हावी यासाठी राज्यपातळीवर अभियानाबरोबरच जनजागृती करण्यात येत आहे. अवयवदानाचे महत्व शालेय स्तरावरुन विदयार्थ्यांना कळावे यासाठी यावर्षी दहावीच्या अभ्यासक्रमात अवयवदानाचा पाठ अंर्तभूत करण्यात आला आहे.
यंदाच्या 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून दहावीचा अभ्यासक्रम बदलला आहे त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. नव्या अभ्यासक्रमात शब्द संपत्तीचा विकास, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, स्वअध्ययन, चिकित्सक वृत्ती, निरीक्षण, निर्णयक्षमता, जबाबदार नागरिकत्वाचे भान,उद्योग-व्यवसायाशी निगडित शिक्षणावर भर देण्यात आला आहे.
राज्य शासनाने दहावीच्या अभ्यासक्रमातील विज्ञान विषयाच्या पुस्तकात अवयवदानाची माहिती देणारा पाठ समाविष्ट केला आहे. अवयवदानाचं महत्त्व आणि अवयवदान कशा पद्धतीने करता येतं याची माहिती मुलांना या पाठाच्या माध्यमातून मिळणार आहे. अवयवदानासोबतच देहदान या विषयावरही माहिती या यात असणार आहे.
देशात अवयवदानाचे महत्त्व आणि माहिती घराघरात पोहोचावी, अवयवदानाबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी राज्य शासनाने इयत्ता दहावीच्या विज्ञान विषयाच्या पुस्तकात अवयवदान, अवयव प्रत्यारोपण आणि देहदानाची माहिती देणारा पाठ समाविष्ट केला आहे.राज्य शासनाच्या या निर्णयामुळे शाळेपासूनच मुलांना अवयवदानाची माहिती मिळणं शक्य होणार आहे. अवयवदानाला प्रोस्ताहन देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.
अवयवदानाबाबत जनजागृती होण्यास मदत होणार –विनोद तावडे
अवयवदानाबाबत समाजामध्ये अनेक समज गैरसमज आहेत. अवयवदानाबाबत राज्य शासन जनजागृती मोहिम घेत असली तरी याबाबत लोकसहभाग वाढणेही आवश्यक आहे. अवयवदान म्हणजे नेमके काय, अवयवदान कधी करता येते, कोणाला करता येते याबाबतची माहिती शालेय स्तरावरुनच विदयार्थ्यांना होणे आवश्यक आहे आणि म्हणूनच दहावीच्या अभ्यासक्रमात अवयवदान हा विषय अंर्तभूत करण्यात आला आहे.
काय माहिती आहे दहावीच्या पुस्तकात
• अवयवप्रत्यारोपण म्हणजे काय.
• कोणत्या अवयवांचे प्रत्यारोपण करणे शक्य आहे
• अवयव प्रत्यारोपण करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात ?
• लोकांचा जीव वाचवण्यासाठी अवयवदान का महत्त्वाचे आहे ?
• देहदान म्हणजे काय, याचा वापर संशोधनासाठी कसा केला जातो याची महिती यामध्ये आहे.