दिपक देशमुख
नवी मुंबई :- राजकुमार चाफेकर यांच्या बेपत्ता होण्याने नवी मुंबईच्या पोलीस वर्तुळात खळबळ उडाली होती. अखेरीला त्यांचा शोध लागल्याने सर्व तर्कवितर्काना पूर्णविराम लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेले सहाय्यक पोलीस आयुक्त राजकुमार चाफेकर अखेर सापडले आहेत. चाफेकर मध्यप्रदेशमधील जबलपूरमध्ये असून ते तिथे कसे पोहोचले आणि का गेले, हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
नवी मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस आयुक्त राजकुमार चाफेकर गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते. सीवूड्स ईस्टेट येथील घरातून ते शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास निघाले होते. मात्र, यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नव्हता. त्यांचा मोबाईलदेखील बंद येत होता. शनिवारी संध्याकाळपर्यंत चाफेकर कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ठावठिकाणा समजत नसल्याने शेवटी त्यांनी एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मिसिंगची तक्रार दाखल करुन घेत तपासाला सुरुवात केली.
अखेर रविवारी सकाळी चाफेकर यांच्याशी संपर्क झाला. चाफेकर जबलपूर रेल्वे स्थानक परिसरात होते, अशी माहिती काही वृत्तवाहिन्यांनी दिली आहे. या वृत्ताबाबत पोलिसांकडून दुजोरा मिळू शकलेला नाही. नवी मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेत एसीपी म्हणून रूजू होण्यापूर्वी चाफेकर यांनी न्हावाशेवा तसेच रायगड जिल्ह्यात पोलीस उपअधीक्षक म्हणून काम केले आहे. निरीक्षक अश्विनी बिद्रे प्रकरणात त्यांनी दोन दिवस तपास केला होता. याशिवाय काही दिवसांपूर्वी सिडकोतील जमिनीची बोगस कागदपत्र तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचाही तपास त्यांच्याच शाखेकडे होता.