दीपक देशमुख
नवी मुंबई : महानगरपालिकेच्या हद्दीतील नाळे पावसाळ्याआधीच स्वच्छ करावेत, नाहीतर पावसाळा सुरू झाला की नाले साफ करत असल्याने त्याचा फायदा नागरिकांना होत नसून संबंधित अधिकारी व ठेकेदारांना होत असल्याने आयुक्तांनी याचा विचार करून मे महिन्यातच स्वच्छ करावेत अशी आग्रही मागणी जनकल्याण सामाजिक संस्थेचे सचिव संतोष सैदाने यांनी केली आहे.
नवी मुंबई शहराच्या पूर्वेला डोंगर असल्यामुळे पावसाळ्यात डोंगराकडून येणारे पाणी नाल्याच्या माध्यमातून खाडीत जाते. त्यामुळे मनपा हद्दीत दिघा पासून ते बेलापूरपर्यंत अनेक नैसर्गिक नाल्यांची निर्मिती झाली आहे. आता नवी मुंबई शहराचे पूर्णपणे शहरीकरण झाल्यामुळे नाल्यातून दररोज सांडपाणी, रासायनिक द्रव्ये व डेब्रिज नियमित येत आहे. तसेच नाल्यालागत वास्तव्य करणारे नागरिकही नाल्यात कचरा टाकत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली तर नाल्यातील पाणी घरात, रस्त्यावर येवू शकते म्हणून दरवर्षी पावसाळ्याआधी नाले स्वच्छ केले जातात.
पावसाळ्यापूर्वी नाले साफ केले गेले पाहिजेत हे सर्वश्रुत असताना नाळे सफाईचा ठेका घेणार कंत्राटदार आपली युक्ती वापरून मे महिन्याच्या समाप्तीला नाले सफाईस सुरुवात करतो. हा ठेकेदार आपला जेसीबीद्वारे नाला स्वच्छ करण्यास सुरुवात करून कचर्याचा ढीग निर्माण करतो. कचर्याचा ढीग निर्माण केल्यानंतर ट्रकद्वारे तात्काळ कचरा उचलण्याची गरज असताना तसे करत नाही. त्यामुळे चार पाच जूनला पावसाच्या सरी आल्यानंतर त्या पाण्याद्वारे जमा केलेला कचरा पावसात खाडीत वाहून जात असल्याने ठेकेदाराचा वाहतुकीचा खर्च वाचतो. या प्रकाराला मनपाचे संबंधित अधिकारीही सहकार्य करत असल्याचा आरोप सचिव संतोष सैदाने यांनी केला आहे.
साधारणतः दोन वर्षापूर्वी नाले सफाईचा काम सिडको करत असे. त्यावेळी कचरा गोळा झाला की लगेचच ट्रक किंवा ढम्परद्वारे कचरा क्षेपनभूमीत टाकण्यास नेला जात असे. त्यावेळी नाल्याची स्वच्छता चांगली होत असे, परंतु नाले महापालिकेकडे हस्तांतरित झाल्यानंतर नाले सफाईचा बाजार झाले असल्याचे मत सैदाने यांनी व्यक्त केले आहे.
मनपा घनकचरा व्यवस्थापन विभाग मागील वर्षापासून नाले स्वच्छ करत आहेत. परंतु अनेक ठिकाणचा गवत, कचरा, माती मातीचा ढीग जसा असतो तसाच आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च करूनही अपेक्षित असलेली स्वच्छता नाल्यात पाहायला मिळत नाही. गेल्या दोन वर्षापासून पावसाळा व्यवस्थित पडत असल्यामुळे पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली नाही. जर २००५ सारखी परिस्थिती निर्माण झाली तर हजारो घरात पाणी घुसून मानव हानी बरोबरच वित्त हानी होण्याची दाट शक्यता असल्याची भीती जनकल्याण सामाजिक संस्थेचे सचिव संतोष सैदाने यांनी व्यक्त केली आहे. याबाबत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तुषार पवार यांना संपर्क साधला असता होऊ शकला नाही.