दीपक देशमुख
नवी मुंबई :- नवी मुंबई :मनपा परिसरात विविध मोकळ्या ठिकाणी डेब्रिजचे डोंगर उभे राहिले असताना मागील आर्थिक वर्षात केलेली तुटपुंजी कारवाई म्हणजे डोंगर पोखरून पकडलेला उंदीर असेच म्हणावे लागेल. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे डेब्रिज विरोधी पथकांची निर्मिती करूनही अपेक्षित अशी कारवाई होत नसल्याने यामागे नक्की काय गौडबंगाल आहे याची चौकशीची मागणी होत आहे.
डेब्रिजचा प्रश्न निकाली निघावा म्हणून दोन डेब्रिज भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली. त्यामध्ये चार चालक व १४ कंत्राटी सुरक्षा रक्षकाची नियुक्त करण्यात आली. त्याचबरोबर त्यांचा पथक प्रमुख म्हणून मनपा आस्थापनेवर असणार्या चार अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एवढे असतानाही मागील आर्थिक वर्षामध्ये फक्त ६८ ढम्पर वर कारवाई केली गेली आहे. हा अहवाल मागील आठवड्यात जाहीर केल्यानंतर घनकचरा व्यवस्थापन विभाग व भरारी पथकाच्या कार्यशीलतेवर प्रश्न उभा रहात आहे.
नवी मुंबई मनपा हद्दीत डेब्रिज टाकण्यास पूर्णतः बंदी घातली आहे. जर मनपा हद्दीत डेब्रिज टाकायचे असेल तर जागा मालकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. परंतु मनपा हद्दीतील जागा या एमआयडीसी, वन विभाग व सिडको प्राधिकरणाची आहे. या ठिकाणी डेब्रिज टाकायचे असेल तर शासकीय कामे चालू असतील अशाच ठिकाणचा ठेका घेणार्या व्यावसायिकांना टाकता येते. एमआयडीसी क्षेत्रात टाकायचे तर संबंधित कारखान्याच्या मालकाची लेखी परवानगी अत्यावश्यक आहे. असे सर्व असताना मनपाच्या हद्दीत ठिकठिकाणी टाकलेले डेब्रिज म्हणजे एक प्रकारे मनपा अधिकारी व डेब्रिज माफिया यांची मिलिजुली सरकारच म्हणावे लागेल असा संताप नवी मुंबईकरांकडून व्यक्त होत आहे.
सध्याच्या स्थितीत वन विभाग, सिडकोचे भूखंड, मोकळ्या जागेवर, खाडी किनारा आदी ठिकाणी डेब्रिज माफियांनी डोंगराच्या डोंगर उभे केल्याचे दिसून येत आहे. महत्वाचे म्हणजे डेब्रिजचे डोंगर उभे रहात असताना भरारी पथक काय करत होते?अशा प्रकारचा मतप्रवाह व्यक्त होत आहे. मे १७ मध्ये घनसोलीतील सदगुरू रुग्णालयाच्या पाठीमागील वनराईत डेब्रिज टाकताना एक सामाजिक संस्थेच्या पदाधिकार्यांनी ढम्पर पकडला. त्यानंतर घणसोली विभाग कार्यालयाचे विभाग अधिकारी दत्तात्रय नागरे आले असता त्यांनी त्या ढम्परच्या चाकाची हवा काढली. ते वाहन जप्त करण्याचे त्यांना अधिकार असतानासुद्धा त्यांनी ती कारवाई केली नाही. त्यानंतर त्याच रात्री ढम्पर मालकांनी टायरमध्ये हवा भरून ढम्पर घेऊन गेला. योग्य कारवाई केली असती तर मनपाच्या गंगाजलीत २५ हजाराने भर पडली असती.असे साईलीला प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय पवार यांनी सांगितले.
नवी मुंबई परिसरात सध्या मुंबई,ठाणे आदी ठिकाणाहून रोज ३०० ते ४०० ढम्पर येत आहेत. ढम्पर पकडल्यावर तात्काळ सोडले तर २५ हजाराचा दंड व सात दिवसानंतर सोडला तर १५ हजार रुपये दंड आहे. जर भरारी पथक व घनकचरा व्यवस्थापन विभागाने निस्वार्थी कारवाई केली तर मनपाच्या महसुलात कोट्यवधी रुपयांची वाढ होईल. परंतु या विभागातील अधिकारी व कर्मचारी चांगली सेवा देत नसल्यामुळे मनपाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. विशेष म्हणजे कारवाई करण्यास अपयश येत आहे म्हणून मागील महिन्यात भरारी पथकातील सोळा सुरक्षा रक्षक व चालकांना घरचा रास्ता दाखविला गेला होता. परंतु अधिकार्यांनी योग्य प्रकारे काम केले तर सुरक्षा रक्षक व चालक ही हिम्मंत दाखवतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे.