दीपक देशमुख
नवी मुंबई : मानवाचे अंतिम ठिकाण म्हणजे स्मशानभूमी. परंतु रबाले झोपडपट्टी परिसरात नवी मुंबई महापालिका स्थापन झाल्यापासून महापालिका प्रशासनाला व सत्ताधार्यांना येथे आजतागायत स्मशानभूमी निर्माण करता आली नाही. यामुळे येथील नागरिकांना अंतिम संस्कार रबाले गावातील स्मशान भूमीत करावे लागत आहे. रबाले गावात जाताना अनेक रस्ते ओलांडून जावे लागत असल्याने नातेवाईकांची अक्षरशः दमछाक होत आसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.त्यामुळे देशातील २१व्या शतकातील आधुनिक शहर समजले जाणार्या हे शोभते का असा सवाल आर पी आय आठवले गटाचे नवी मुंबई युवक उप अध्यक्ष भरत भालेराव यांनी विचारला आहे.
दरम्यान येथील नागरिकांनी साईबाबा नगरच्या पायथ्याशी अनधिकृत स्मशानभूमी तयार केली होती .परंतु आता तिथे एमआयडीसीची इमारत झाल्याने येथील नागरिकांना रबाले गावातील स्मशानभूमी शिवाय पर्याय उरला नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
रबाले झोपडपट्टीत सध्या २०११च्या जनगणनेनुसार २० हजार नागरिक वास्तव्यास आहेत. या ठिकाणी रोज एक तरी नागरिक मृत होत आहे. परंतु या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी येथील नागरिकांना एक किलोमिटर अंतर पार करून रबाले गावातील मनपाच्या स्मशानभूमीत यावे लागते. या स्मशानभूमीत येताना पहिले ठाणे बेलापूर महामार्ग पार करून ऐरोलीच्या दिशेने आल्यानंतर ऐरोली,मुलुंड महामार्ग पार करावे लागत आहे. यामुळे नागरिकांना व नातेवाईकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे आर पी आय आठवले गटाचे उपाध्यक्ष भालेराव यांनी सांगितले.
रबाले गावात जाताना होणार्या अडचणी कमी व्हाव्यात म्हणून येथील नागरिकांनी साईबाबा नगर, महापे, ठाणे महामार्गालगत एक छोटेखानी स्मशानभूमी निर्माण केली होती. त्यावर काही नागरिक अंत्यसंस्कार करत असत. परंतु तोच भूखंड एमआयडीसी प्रशासनाने एका खाजगी कारखान्याला दिल्यामुळे संबंधित मालकांनी तिथे इमारत बांधल्यामुळे येथील नागरिकांना आता पुन्हा एकवार रबालेगावतील स्मशानभूमी शिवाय पर्याय नसल्याचे येथील नागरिक प्रकाश गमरे यांनी सांगितले.
नवी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने विविध नागरी कामे मोठ्या प्रमाणात सुरू असताना रबाले झोपडपट्टी परिसरात मानवाचा अंतिम ठिकाण निर्माण करू शकत नाही. गेल्या अनेक वर्षात अनेक राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मनपाला हे शोभत नसल्याचे मत आरपीआय आठवले गटाचे युवक उपाध्यक्ष भालेराव यांनी व्यक्त केले आहे.
रबाले गाव परिसरात जायचे म्हणजे अनेक रस्ते पार करून जावे लागते .त्यामुले कधी कधी अपघाताच्या घटना घडत आहेत. जर अपघात होऊन एखाद्या नागरिकांचा मृत्यू ओढवला तर जबाबदारी कोणाची याचाही विचार मनपा प्रशासनाने करावी असेही भरत भालेराव यांनी सांगितले.
या बाबत मालमत्ता उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांना विचारले असता,एक भूखंड उपलब्ध असून त्या भूखंडाविषयी न्यायालयात दावा चालू आहे,त्यामुळे अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सत्ताधारी आणि महापालिका प्रशासनाच्या उदासिनतेमुळे येथील रहीवाशांची मरणानंतरही अत्यंविधीकरिता आजही परवडच सुरू असल्याचा संताप स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.