पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि पनवेलचे आमदार मा. प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थित सोहळा संपन्न
स्वयंम न्युज ब्युरो :- ८३६९९२४६४६
उरण :- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ऊज्वला योजनेच्या वर्षपुर्तीचे औचित्य साधून रायगड जिल्ह्यातील उरण येथे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबातील महिलांना एलपीजी गॅसकनेक्शनचे वितरण करण्यात आले. रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि पनवेलचे तरूण व अभ्यासू आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले.
स्वयंपाक करताना लाकडी सरपण वापरल्यामुळे निर्माण होणार्या धुरापासून होणारे प्रदुषण आणि महिलांच्या आरोग्यावर या घातक धुराचे होणारे तीव्र दुष्परिणाम कमी करण्याच्या हेतुने गतवर्षी २० एप्रिल रोजीदेशपातळीवर ऊज्वला योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत गेल्या वर्षभरात भारताच्या ग्रामीण भागातील लाखो गरीब कुटुंबातील महिलांना स्वयंपाकाच्या गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले आहे. पर्यावरणरक्षण तसेच महिला सबलीकरण असा दुहेरी हेतू साध्य करणार्या या योजनेची रायगड जिल्ह्यातही प्रभावी अंमलबजावणी सुरू असून आज या योजनेच्या वर्षपुर्तीनिमित्त उरण येथे पंधरा गरीब कुटुंबांना गॅस कनेक्शनदेण्यात आले. ही पंधरा कुटुंबे अनुसुचित जाती आणि जमातीमधील असून प्रातिनिधीक स्वरूपात हे वितरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा भाजपच्या वतीने देण्यात आली. यावेळी बोलताना पालकमंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले की, ऊज्वला योजनेच्या वर्षपुर्तीनिमित्त हे वाटप करण्यात आले असून जिल्ह्यातील अधिकाधिक गरजू कुटुंबांपर्यंत गॅसचे कनेक्शन पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या योजनेबाबत सर्वसामान्य महिला समाधान व्यक्त करत आहेत, अशी प्रतिक्रिया आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केली. स्वयंपाकासाठी लाकडी सरपण इंधन म्हणून वापरल्यानेनिर्माण होणार्या धुरामुळे महिलांमध्ये श्वासोच्छवासाशी निगडीत आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. चुलीतील धुरामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन भारतात महिलांचे होणारे मृत्यू कमी करणे,तसेच महिलांना स्वयंपाक करताना एक आरोग्यदायी अनुभव मिळणे, हा या योजनेचा प्रमुख उद्देश असल्याचेही ते म्हणाले. बीपीसीएल या कंपनीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.