** 15 वर्षात नियोजन केले असते तर पाणी टंचाई जाणवली नसतीः देशमुख
पनवेल :- पनवेलकरांच्या पाणी प्रश्नावर आक्रमक झालेले पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी महापालिकेच्या दारातच ठिय्या आंदोलन करत आमरण उपोषण छेडण्यास प्रारंभ करताच, आयुक्तांनी चर्चेस बोलाविले. उभयतांमध्ये झालेल्या ठोस चर्चेतून आयुक्त गणेश देशमुख यांनी पनवेलकरांसाठी आजपासून पन्नास टँकरद्वारे पाण्याचे वितरण सुरळीत केले जाईल, यासोबत 100 कोटीच्या अमृत योजनेला शासनस्तरावर मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्नशिल राहून भविष्यात पनवेलकरांवर पाणी कपातीची वेळ येऊ देणार नसल्याचे, लेखी आश्वासन कडू यांना दिले. त्यानंतर कडू आणि त्यांच्या सहकार्यांनी उपोषण तूर्तास मागे घेत असल्याचे आयुक्तांना कळविले आहे.
**************************************
इशार्यानंतर पहिल्यांदा सभागृहात सत्ताधार्यांना आठवले पाणी‘
महापालिकेच्या स्थापनेपासून झालेल्या 13 महासभांमध्ये पाणी प्रश्नावर चकार शब्दही काढण्यात आला नव्हता. मात्र, 12 एप्रिलला संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी महापौर डॉ. कविता चौतमल आणि तत्कालीन आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना लेखी पत्राद्वारे पाणी प्रश्नावर कोंडीत पकडून आठ दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानंतर काल पहिल्यांदा सभागृहात पाणी प्रश्नावर चर्चा करण्याची बुद्धी सत्ताधार्यांना सुचली. हे आंदोलनाचे यश असल्याचे कडू यांनी सांगितले. मात्र, इतक्या गंभीर प्रश्नावर महापौर डॉ. चौतमल गंभीर नसल्याने त्यांनी कडू यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याचे दायित्वही न दाखविल्याने त्यांच्यासह सत्ताधारी आणि प्रशासनाचाही निषेध करण्यात आला.
**********************
पन्नास टँकरची फक्त आवई!
नवी मुंबई महापालिकेकडून पन्नास टँकर मिळत असल्याची आवई उठविली जात असल्याबद्दल कडू यांनी आयुक्तांना विचारले असता, अद्याप यंत्रणेला पूर्ण यश आले नसून दररोज 20 ते 22 टँकर पाणी येत असल्याची माहिती आयुक्त देशमुख यांनी शिष्टमंडळाला दिली. त्यावर चर्चा करताना, टॅकर मालकांना सुधारित दराने भाडे देण्याचे निर्देश आयुक्तांनी पाणी पुरवठा अधिकारी धर्मराज अलगड यांना दिले.
***************
पाणी चोरीला आळा घालण्यासाठी जीपीएस सिस्टीम
शहराला पाणी टंचाई ग्रासत असताना नवी मुंबई महापालिकेकडून होणार्या पाणी पुरवठ्याच्या वितरणात अनेक त्रुटी आढळून येत असल्याचे सांगत ते पाणी चोरट्या मार्गाने विकले जाण्याची शक्यता असून त्यामुळे पनवेलकरांच्या तोंडचे पाणी यंत्रणाच गायब करीत असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर उपाययोजना म्हणून प्रत्येक टँकरला जीपीएस सिस्टीम बसविण्याचे आदेश त्यांनी दिले.
*****************
पंधरा वर्षात नियोजन केले असते तर…!
——————————
पाणी प्रश्नावर गेल्या पंधरा वर्षात काही ठोस निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली असती तर आजची परिस्थिती उद्भवली नसती, अशा शब्दात ‘अनुभवी’ आयुक्त गणेश देशमुख यांनी सत्ताधार्यांचा बुरखा अतिशय शांतपणे चर्चेतून टराटरा फाडला. पाण्यासाठी योजना नाही, निर्णय नाही मग पनवेलकरांना पाणी कसे मिळणार? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
*******************************
शंभर कोटीच्या योजनेला मंजुरी मिळविणार
अमृतयोजनेचा कृती आराखडा शासनाला अद्याप सादर न केल्याने तो निधी पडून आहे. येत्या 31 मेपर्यंत तो आराखडा तयार करून शासनाला सादर केला जाईल. त्यानंतर पाणी प्रश्न सुटण्यास मोठी मदत होईल. याकरीता चार महिन्याचा कालावधी लागेल. पण चार महिन्यात पनवेलकरांना आपल्या कामाचा अनुभवही घेता येईल, अशी आश्वासक ग्वाही देशमुख यांनी दिली.
कांतीलाल कडू यांच्या शिष्टमंडळासोबत आयुक्तांनी तब्बल 45 मिनिटे सविस्तर चर्चा करून त्यांना पाणी पुरवठा आजपासूनच सुरळीत करण्याचे आश्वासन आणि शंभर कोटीच्या योजनेचा आराखडा तयार करून शासनाकडून मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्नशिल राहणार असल्याचे सांगून कडू यांच्या आंदोलनातून पाणी प्रश्नाला चालना मिळाली आहे.
***************************
धरणातील गाळ काढण्यासाठी पालकमंत्र्यांचा फोन
देहरंग धरणातील गाळ काढण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा फोन आला होता. त्यांच्या सोबत स्थानिक आमदार होते. पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकार्यांना गाळ काढण्यासाठी महसूल न आकारण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती शिष्टमंडळाला दिली. तर गाळातून माती चोरीला प्रोत्साहन देण्यापेक्षा तो गाळ तांत्रिकदृष्ट्या नियोजनबद्ध पद्धतीने काढण्यात यावा. धरणाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले नाही. धरण कमकुवत झाले असून त्याला फार मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने चुकीच्या पद्धतीने गाळ काढून माती नेल्यास भविष्यात नैसर्गिक आपत्ती उद्भवून तेथील गावे धरणाच्या पाण्याखाली जाण्याची शक्यता कांतीलाल कडू यांनी वर्तविली. त्याबाबत देशमुख यांनी दक्षता घेण्याची गरज असल्याचे सांगितले.
************************
एमजेपीसोबत बैठक सुरू
संघर्ष समितीच्या मागणीनुसार एमजेपी आणि एमआयडीसीकडून वाढीव पाणी मिळावे, याकरीता आयुक्तांनी तातडीने संबंधित अधिकार्यांसोबत बैठक बोलाविली. त्यातूनही पाणी वाढवून मिळण्याची त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.
दरम्यान, कडू यांनी हे आंदोलन आपण आयुक्तांच्या विनंतीला मान देवून तूर्तास मागे घेत असलो तरी त्यांनी लेखी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यास विलंब लावल्यास आंदोलनाचा अधिकार राखून ठेवला आहे, असे प्रशासनाला सांगितले आहे. शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्यासह गोपनिय खात्यातील पोलिस कर्मचारी उपस्थित होते. तसेच चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कडू यांच्या उपोषणाच्या भीतीने सत्ताधार्यांनी महापालिकेकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसत होते.
उपायुक्त जमिर लेंगरेकर यांनी, आयुक्तांच्या आदेशानुसार उपोषण न करण्याची लेखी पत्राद्वारे विनंती कडू यांना केली होती. आयुक्त नवे असल्याने त्यांना आठ ते दहा दिवसाचा कालावधी द्यावा, पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ठोस आश्वासन जोपर्यत मिळत नाही तोपर्यत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचे सांगत कडू यांनी आज पाण्यासाठी आंदोलन छेडले आणि ते यशस्वीही केले.
कडू यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रूपा कडू, चिरंजीव शर्वाय कडू, संघर्षच्या उपाध्यक्ष माधुरी गोसावी, ज्येष्ठ नेते उज्वल पाटील, सेक्रेटरी चंद्रकांत पाटील, स्मिता तेजे-शहाशने, मंगल भरवाड, रामाश्री चौहान, मुद्दसर पटेल, महेंद्र विचारे, बाळाराम पाटील, राजेश पाटील, नाना माहिते, सागर तवळे, रमाकांत वेदक उपोषणात सहभागी झाले होते.