मुंबई : राज्यातील रस्त्यांवरील वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन राज्यशासनाने रस्ता सुरक्षेची मोहीम हाती घेतली आहे. येत्या सोमवारपासून या मोहिमेला प्रारंभ होणार आहे.
23 एप्रिल ते 7 मे या पंधरवड्यादरम्यान चालणाऱ्या या विशेष मोहिमेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे.
राज्यात मार्च अखेरपर्यत 3 लाख 28 हजार नोंदणीकृत वाहने आहेत 3 लाख 40 हजार परवानाधारक वाहनचालक आहेत. राज्यातून प्रवास करणारी व राज्याबाहेरील वाहनांची मोठी संख्या आहे. देशपातळीवर अपघाती मृत्यू या निकषावर राज्याचा तिसरा क्रमांक लागतो. राज्यातून प्रवास करणाऱ्या आणि राज्याबाहेरील वाहनांची मोठी संख्या हे एक मोठे आव्हान आहे.
राज्यात एकूण 743 अपघातग्रस्त ठिकाणे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निश्चित करण्यात आले आहेत. रस्त्यावरील वाढते अपघात मृत्यू ही चिंताजनक बाब असून 2017 या वर्षात एकूण 35 हजार 853 अपघात झाले. यावर्षात एकूण 12 हजार 264 व्यक्ती रस्ते अपघातात मृत पावल्या तर 32 हजार 128 व्यक्ती गंभीर जखमी झाल्या.
अपघात व्यक्तीमध्ये 25 ते 45 वयोगटातील व्यक्तीची संख्या मोठी असल्याचे आढळले आहे. राज्यातील अपघातग्रस्त ठिकाणावर सुधारात्मक उपाययोजना शासनाकडून करण्यात येत आहे. राज्यातील वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र तपासणीसाठी देशातील पहिले स्वयंचलीत चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. राज्यात 35 परिवहन कार्यालयात ब्रेक तपासणी चाचणीची सुविधा उभारण्यात आली आहे.
राज्यात अपघातोत्तर वैद्यकीय सुविधा पुरविण्यास्तव एकुण 108 ट्रॉमा केअर सेंटर कार्यरत आहेत. तसेच 108 क्रमांकाच्या एकूण 937 ॲम्ब्युलन्स 24 तास कार्यरत आहेत. रस्ता सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या निवृत्त न्यायमूर्ती राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली दिलेल्या सर्व निर्देशांची पूर्तता करण्यात आली आहे. राज्याचा सन 2020 पर्यंतचा रस्ता सुरक्षा कार्यआराखडा अंतीम करण्यात येत आहे.
रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी अंमलबजावणी प्रशिक्षण व रस्ते बांधणी या तीन विषयांवर मुख्यत: भर दिला जातो. रस्ते अपघांतासंदर्भात धोरण ठरविणे व शासनाच्या विविध विभागांमध्ये समन्वय आणि नियंत्रण ठेवणे याकरिता परिवहन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा परिषदेची 2015 मध्ये स्थापना करण्यात आली आहे. सर्व जिल्ह्यात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीमार्फत स्थानिक पातळीवर रस्ता सुरक्षाविषयक कार्य पार पाडले जाते.
प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकांमध्ये महामार्ग पोलीस, मुंबई वाहतूक पोलीस आणि आरोग्य विभाग यांच्या विविध योजनांसाठी प्रस्तावित 42 कोटींच्या प्रस्तावास तत्वत: मान्यता दिली आहे. रस्ता सुरक्षा व ध्वनीप्रदूषण याविषयी जनजागृती करण्यासाठी मागील महिन्यात वानखेडे स्टेडीयम रस्ता सुरक्षा-11 विरुध्द नो हॉन्कींग-11 या गटात क्रिकेट मॅच घेण्यात आली आहे त्याचबरोबर जानेवारीत झालेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये धावपट्टूंचा सहभाग घेवून जनजागृतीही करण्यात आली आहे.