दीपक देशमुख़
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या मनपाच्या परिवहन विभागातील असलेल्या बसेसची निगा व्यवस्थित राखली तर नवीन बसेस विकत घेण्याची गरज भासणार नाही.परंतु असलेल्या बसेस पैकी सुमारे १२५ बसेस दुरुस्ती अभावी उभ्या असल्याने नवीन बसेस खरेदी करण्याचा षडयंत्र फक्त दलाली घेण्यासाठी चालला असल्याचा आरोप नवी मुंबई महानगर पालिका कर्मचारी व कामगार सेनेचे सरचिटणीस प्रकाश चिकणे यांनी केला आहे. दरम्यान आताही नवीन तीस बसेस खरेदी करून फायदा काय होईल असाही प्रश्न विचारला जात आहे.
मनपाच्या ताफ्यात सध्या ४८३ विविध प्रकारच्या सध्या बसेस उपलब्ध आहेत.त्यामध्ये तुर्भे आगारात २०७,आसूडगाव आगारात १६२ तर घणसोली आगारात ११४ बसेस प्रवाशांसाठी दिल्या आहेत. त्यापैकी सुमारे १२५ बसेसची अपेक्षित दुरुस्ती केली नसल्याने उभ्या आहेत.त्यामुळे बसेस कमी पडत असल्यामुळे साडे आठ कोटी रुपये खर्च करून नवीन तीस बसेस खरेदी करत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
सध्या एन एम एम टी उपक्रमाला महाराष्ट्र शासन,केंद्र शासनाच्या अनुदानातून अनेक वेळा बसेस दिल्या गेलेल्या आहेत. त्या बसेस जोपर्यंत खराब होत नाहीत, तोपर्यंत त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्या एकदा खराब व्हायला लागल्या की नवीन बसेस खरेदी करण्याचा फंडा परिवहन मंडळ व महापालिका प्रशासनाने स्वीकारला आहे. नवीन बस खरेदी करताना प्रशासनाला चांगलाच अपेक्षित फायदा होत असल्यानेच नवीन बसेस खरेदी केल्या जात असल्याचे प्रकाश चिकणे यांनी सांगितले.
घणसोली आगार ठेकेदार श्री महालक्ष्मी ट्रान्स्पोर्टला दोन वर्षापूर्वी आंदण दिला आहे. येथे ११४ ज्या बसेस आहेत. त्या सर्व नवीन आहेत. त्या ठेकेदारांनी बसेसची व्यवस्थित निगा न राखल्याने आज त्या बसेसची अवस्था भयावह झाली आहेे .तुर्भे आगारातील अवस्थाही यापेक्षा वेगळी नसल्याचे वास्तव आहे. आसूडगाव आगारात असणार्या बसेस ह्या जुन्याच असल्याने तेथील अवस्था तर फार भयानक आसल्याचे परिवहन सूत्रांनी सांगितले.
ज्या बसेस चालू अवस्थेत आहेत.त्या बसचे आरसे, ब्रेक दोर्याने बांधलेले आहेत. काही बस तर एक बाजूला झुकून चालतात,या अवस्थेतही चालक बस कशी तरी चालवत आसल्याचे वास्तव परिवहन विभागात आहे. तसेच अनेक बसेसचे सीट तुटलेल्या अवस्थेत आहेत, तर काही बसेसचे पत्रे निखळलेले आहेत. इत्यादी अडचणींचा सामना करत बसेस सेवा देत आहेत.याही बसेसची निगा व्यवस्थित राखली नाहीतर अनेक बसेस बंद अवस्थेत आगारात उभ्या राहतील अशी भीती ही सरचिटणीस प्रकाश चिकणे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आहे त्या बसेस ची मन लावून निगा राखली तर जनतेचा पैसाही वाचेल व नागरिकांना चांगली सेवा देऊ शकतो अशी आशाही प्रकाश चिकणे यांनी व्यक्त केली आहे.
याबाबत परिवहन सभापती प्रदीप गवस याना विचारले असता, बसेसची निगा व दुरुस्ती व्यवस्थित करण्याचे आदेश देतो असे सांगितले.