नवी मुंबईतील नागरी समस्या तसेच विविध विषयांवर चर्चा
नवी मुंबई :- नवी मुंबईतील विविध नागरी समस्या तसेच प्रलंबित अनेक विषयांसंदर्भात बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांची नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांजबरोबर नुकतीच बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत नवी मुंबई ज्येष्ठ नागरिकांसाठी ओल्ड एज होम उभारणेकरिता रु. 25 कोटींची भरीव तरतूद करणे, नवी मुंबईतील समुद्रखाडीकिनाऱ्यांचे सौंदर्यीकरण व सुशोभीकरण करणेकरिता रु. 100 कोटींची तरतूद करणे, नवी मुंबई क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविणे, नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या गावठाणांचे सिटीसर्व्हे करणे, नवी मुंबई गावठाण क्षेत्रातील मोडकळीस आलेल्या घरांच्या पुनर्बांधणीकरिता परवानगी देणे, नवी मुंबई महानगरपालिकेने वाहन पर्किंगसाठी लावलेले झिझिया कर रद्द करणे, दिवाळे गावातील मच्छीमार्केट मागील बाजूस स्थलांतरित करून रस्ता रुंदीकरण करणे, नवी मुंबईतील तुर्भे नाका येथे रोजंदारीवर काम करणाऱ्या नाका कामगारांसाठी स्वच्छता गृहे, नळ जोडणी व निवारा शेड उपलब्ध करणे, झोपडपट्टीधारकांना फोटोपास वाटप करणे, आमदार निधीतून मंजूर झालेल्या निधीतून वाशी से-9 येथील भाजी मार्केटला शेड बांधून सुसज्ज तयार करणे अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, नवी मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांसाठी ओल्ड एज होम करिता सिडको भूखंड देण्यास तयार असून सदर ओल्ड इज होम उभारणीकरिता पालिकेला रु. 25 कोटींची तरतूद करण्याची मागणी आम्ही केली असून पालिका आयुक्तांनीही त्यास हिरवा कंदील दिला आहे. नवी मुंबई महानगरपालिका हद्दी अंतर्गत येणाऱ्या मुळ गावठाणांपैकी बहुतांशी मूळ गावठाणांचा सिटी सर्व्हे न झाल्याने स्थानिक प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या मालमत्ताबाबत कायदेशीर प्रक्रिया व घरे विकसित करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने पालिका हद्दीतील मूळ गावठाणांचे सिटीसर्व्हे लवकरात लवकर करण्याची मागणीही करण्यात आली आहे. नुकताच पालिकेने वाहनधारकांसाठी लावलेले झिझिया कर रद्द करून प्रथमतः प्रत्येक विभागात पार्किंगची व्यवस्था करणे, समुद्रखाडी किनाऱ्यांचे सुशोभीकरण, झोपडपट्टी पुनर्विकास, दिवाळे गावातील रस्त्यांचे रुंदीकरण अशा अनेक विषयांवर चर्चा झाली असून पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनीही सदरबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
यावेळी डॉ. रामास्वामी एन. यांनी सांगितले कि, ओल्ड एज होम साठी महापालिकेनेही सकारात्मक भूमिका घेतली असून मूळ गावठाणांचा सिटीसर्व्हेही लवकरच सुरु होणार असून सदर प्रक्रियेचे काम सुरु आहे. अर्ज केलेल्या झोपडपट्टीधारकांना फोटोपास वाटप करण्यात येणार असून नवी मुंबईतील वाहनधारकांसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात येईल. आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केलेल्या मागण्या रास्त असून त्यांच्या सर्व मागण्या त्वरित पूर्ण करण्यात येणार असल्याचेही डॉ. रामास्वामी एन. यांनी सांगितले.
यावेळी रामचंद्र घरत, संपत शेवाळे, सुनील पाटील, विजय घाटे, दत्ता घंगाळे, गोविंद करणानी, प्रभाकर कांबळे, नीलकंठ सोनार, मोहन राणे, चंद्रकांत पारपिल्लेवार, शैलजा पाटील, नारायण वाघमारे, सुरेश गोरे तसेच अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.