दीपक देशमुख
नवी मुंबई : गटारे स्वच्छ करायच्या नावाखाली घणसोली विभाग कार्यालयाच्या हद्दीत गेल्या तीन दिवसापासून गटारावरील झाकणे काढल्यामुळे अपघाताच्या घटना घडल्याने नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे झाकणे त्वरित बसवावित अशी मागणी नागरिक मोठ्या संख्येने करत आहेत.
दरम्यान गटारा मधूनच जलवाहिनी,विद्युत वाहिन्या गेल्यामुळे गटार स्वच्छ कशी करायची असा प्रश्न सफाई कामगारांना पडला आहे. तसेच ठेकेदारांनी दिलेले सुरक्षात्मक साहित्य पुन्हा ठेकेदारांनी घेतल्याने सफाई कामगारांना दुर्गधीचा सामना करावा लागत असल्याने सफाई कामगारांमध्ये नाराजी पसरली आहे.
पावसाळीपूर्व कामाचा एक भाग म्हणून गटार सफाई सध्या घणसोली विभाग कार्यालयाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गटार व्यवस्थित साफ झाले की नाही यासबबीपायी पालिकेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी पाहणी केल्यानंतर गटारावरील झाकणे बसविण्यास सांगितले आहे. परंतु गटारावरील झाकणे पुन्हा बसविली नसल्याने अनेक नागरिक गटारात पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये लहान मुलांचा जास्त समावेश असल्याचे साई सदानंद नगरमधील रहिवाशी अमित काळसेकर यांनी सांगितले. त्यामुळे गटार साफ केले की लगेच झाकणे बसविणे गरजेचे असल्याचे चंद्रकांत भालेकर यांनी सांगितले. घणसोली परिसरातील मनपा व शासनाच्या विद्युत विभागाने कोणताही मागचा व पुढचा विचार न करता विद्युत वाहिन्या गटारात टाकल्याने गटर स्वच्छ कसे करायचे असा यक्ष प्रश्न पडला असल्याचे सफाई कामगारांनी सांगितले.
काही गटारात तर वीजेचा करंटही येत असल्याने आम्ही काम कसे करायचे असेही सफाई कामगारांनी आपले म्हणणे व्यक्त केले आहे. त्यामुळे मनपा व शासनाच्या ठेकेदारांनी झटपट कामापायी सुरू केलेल्या प्रकारामुळे नागरिकांना याचा त्रास होत असल्याचे सर्वधर्मसमभाव मित्र मंडळाचे संस्थापक संतोष सैदाने यांनी सांगितले.
बहुतांशी गटारातून पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्या गेल्यामुळे सुद्धा गटर साफ करणे जिकरीचे झाले आहे. गटार साफ करताना जलवाहिनी तुटली तर नागरिकांना खराब पाणी प्यायला लागेल यामुळे गटार स्वच्छ करताना सफाई कर्मचार्यांना प्रतिबंध येत असल्याचे सफाई कामगारांनी सांगितले. गटार साफ करताना आयुक्तांच्या आदेशाने मास्क व हातमौजे कामगारांना देण्याचे ठेकदाराना आदेश आहेत. परंतु ठेकेदार चलाखी करून कामगारांना हातमौजे व मास्क देण्याचे नाटक करून व साहित्य मिळाले अशा प्रकारची सही घेऊन पुन्हा ते साहित्य दुसर्याला देत असल्याचे सफाई कामगारांनी सांगितले. त्यामुळे सफाई कामगारांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे अशा ठेकेदारांची आयुक्तांनी चौकशी करून त्यांना काळ्या यादीत टाकावे अशी मागणी संस्थापक संतोष सैदाने यांनी केली आहे.
यासंदर्भात मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनवणे याना विचारले असता गटारावरील झाकणे लगेच टाकण्याचे आदेश देतो तसेच मास्क व हातमौजे संदर्भात चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करतो असे सांगितले.