स्वयंम न्युज ब्युरो :- 9619197444
नवी मुंबई : वाशी रेल्वे स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेला सिडको एक्झिबिशन सेंटरला लागून असलेला महाराष्ट्र भवनचा भुखंड मनसेच्या पाठपुराव्यामुळे गेल्या काही महिन्यापासून प्रकाशझोतात आलेला आहे व चर्चेमध्ये राहीलेला आहे. मनसेचे गजानन काळे व त्यांचे सहकारी जे बोलतात ते करून दाखवितातच याचा प्रत्यय नवी मुंबईकरांना महाराष्ट्र दिनी पुन्हा एकवार जवळून पहावयास मिळालेला आहे. महाराष्ट्र भवनासाठी मनसेचे गजानन काळे व त्यांचे सहकारी पाठपुरावा करत असताना इतर पक्षीयांची महाराष्ट्र भवनाबाबतची उदासिनता नवी मुंबईकरांमध्ये संताप निर्माण करू लागली आहे.
मनसेसुप्रिमो राजसाहेबांच्या आदेशाने आज १ मे महाराष्ट्र दिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली वाशी सेक्टर-३०अ येथील महाराष्ट्र भवनसाठी आरक्षित भूखंडावर विधिवत भूमिपूजन केले. यावेळी मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. ‘महाराष्ट्र भवन झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, सिडको आणि राज्य शासनाचा निषेध असो निषेध असो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो’ या घोषणा महाराष्ट्र सैनिकांनी देऊन संपूर्ण परिसर दणाणून सोडला. याप्रसंगी कुदळ व फावड्याने माती खणून मनसे पदाधिकार्यांनी महारष्ट्र भवनच्या इमारतीसाठी पाया खोदला, तसेच महारष्ट्र भवनच्या नामफलकासमोर नारळ फोडून हार घातला. कोणत्याही परिस्थितीत या आरक्षित भूखंडावर महाराष्ट्र भवन व्यतिरिक्त कोणतीही दुसरी वास्तू उभारु देणार नसल्याचा पुनरुच्चार यावेळी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केला.
ाही दिवसांपूर्वीच सिडको व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्या दालनात घुसून मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत महाराष्ट्र भवनची मागणी केली होती. तर त्याआधी २७ फेब्रुवरी मराठी भाषा दिनी सदर आरक्षित भूखंडावर महाराष्ट्र भवनचा नाम फलक नवी मुंबई मनसे तर्फे लावण्यात आला होता. या भूखंडावर अगोदर ही जागा महाराष्ट्र भवनसाठी आरक्षित असल्याचा नामफलक सिडकोने लावला होता मात्र तो फलक काही काळानंतर काढून टाकण्यात आल्यामुळे या भूखंडावरील आरक्षण सिडकोने जाणीवपूर्वक हटवले असून, हा भूखंड बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा मनसे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
सिडकोने या भूखंडावरील महाराष्ट्र भवनचे आरक्षण सरकारशी संगनमत करून हटवले असल्यास मनसे न्यायायालात जनहित याचिका दाखल करेल असे उपशहर अध्यक्ष विनोद पार्टे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. तसेच सिडको व्यवस्थापकीय संचालक यांची गाडी अडवून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी मनसेने प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे.
मनसेने सातत्याने पाठपुरावा करूनही राज्यशासन व सिडको या संदर्भात गंभीर नाही. मात्र सिडकोने प्रकाशित केलेल्या वार्षिक २०१८ डायरीमध्ये मेघालय, आसाम व नागालँड भवन हे सिडकोनेच बांधून दिल्याचे स्पष्ट केले आहे. मनसेने माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतानाही महाराष्ट्र भवन बाबत सिडको आणि राज्य सरकार यांच्यामध्ये अद्याप कोणताही पत्रव्यवहार झाला नसल्याचे दिसते. तसेच सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत ही या बाबत कोणताही ठराव झाला नसल्याची आमची माहिती आहे व या सगळ्या बाबींवरून राज्य सरकार सिडको महाराष्ट्र भवन बाबत गंभीर नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
याप्रसंगी भूमिपूजनाच्या कार्यक्रमात मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे, उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले, विनोद पार्टे, डॉ.आरती धुमाळ, अनिथा नायडू, प्रिया गोळे, गायत्री शिंदे, नितीन खानविलकर, अभिलेश दंडवते, अमोल इंगोले, अजय सुपेकर, अक्षय भोसले, शरद दिघे, सखाराम संकपाळ, अमोल ऐवळे, प्रेम जाधव, आसिफ शेख, सागर मांडे, ज्ञानेश्वर निकम, विनायक पिंगळे व मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.