दीपक देशमुख
नवी मुंबई : विधानसभा हिवाळी अधिवेशनात नवी मुंबईतील नाल्यातून जाणार्या रासायनिक मिश्रीत द्रव्य संबंधी विषय निघाल्यानंतर रासायनिक मिश्रीत द्रव्य बंद झाले होते. परंतु आता पुन्हा तेच द्रव्य पुन्हा सुरू झाल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. रासायनिक मिश्रीत द्रव्ये पुन्हा सुरू झाल्यामुळे रासायनिक कारखान्यावर अंकुश ठेवण्यास संबंधित प्रशासन अपयशी ठरले असल्याचे दिसून येत आहे.
१० वर्षापासून नवी मुंबईतील घणसोली, महापे, पावणे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातून रासानिक मिश्रीत द्रव्ये सोडले जात आहे. या रासायनिक मिश्रीत द्रव्यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होणे, नाकाला झिणझिण्या येणे, लहान शिशु,गरोदर माता तसेच वयोवृद्ध नागरिकांना जास्त त्रास होत होता. त्याचबरोबर रासायनिक द्रव्याच्या वासामुळे कर्करोगासारखा दुर्धर आजार होण्याची शक्यता जास्त आहे. विविध पक्षांच्या नगरसेवकांनी तसेच सामाजिक संस्था, मंडळांनी याविरोधात आवाज उठवला होता. परंतु त्यानंतरही प्रदूषण महामंडळाच्या प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नव्हती.
मागील वर्षी मनपाच्या पर्यावरण समिती सभापती दिव्या गायकवाड विराजमान झाल्यानंतर त्यांनी रासायनिक मिश्रीत द्रव्याचा विषय योग्य प्रकारे पकडून मनपा व प्रदूषण महामंडळ प्रशासनाच्या बैठकावर बैठक घेऊन कारवाई करण्यास भाग पाडले होते. यानंतर आमदार संदीप नाईक यांनी हा विषय २०१८च्या विधानसभा हिवाळी अधिवेशनात मांडला. त्यानंतर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी संबंधित कारखान्यांना नोटीसा दिल्या होत्या. त्यानंतर काही दिवसांनी रासायनिक कारखान्यांनी रासायनिक द्रव्ये सोडले नव्हते.
परंतु सध्या घणसोली, महापे, पावणे येथील नाल्यातून गेल्या दोन दिवसापासून पुन्हा काळा व लाल रंगाचा रासायनिक द्रव्ये पुन्हा सोडला जात असल्याचे वास्तव आहे. या रासायनिक द्रव्याचा वाईट परिणाम सजीवाबरोबरच वृक्षावर मोठ्या प्रमाणात होत असल्याने हे रासायनिक द्रव्ये कायमचेच बंद होणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नाहीतर भविष्यात अनेकांना याचा वाईट परिणाम भोगावे लागेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.
याबाबत पर्यावरण समिती सभापती दिव्या गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता,आता मी पुन्हा स्वतः पाहणी करुन अधिकार्यांना जाब विचारून धारेवर धरणार आहे असे सांगितले.