नवी मुंबई :- महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येणा-या नागरी सुविधांचा दर्जा राखला जावा व ही कामे गतीमानतेने पूर्ण व्हावीत यादृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी नेरूळ, वाशी व कोपरखैरणे विभागातील कामांची पाहणी केली व कामात गतीमानता आणणेबाबत संबंधितांना निर्देश दिले. अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, शहर अभियंता मोहन डगांवकर, सहा. संचालक नगररचना ओवैस मोमिन, परिमंडळ 1 चे उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, परिमंडळ 2 चे उप आयुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे, कार्यकारी अभियंता सुभाष सोनावणे, संजय देसाई, अरविंद शिंदे आणि संबंधित अधिका-यांसह आयुक्तांनी विविध कामांना भेटी दिल्या.
यामध्ये सिडको वसाहती अंतर्गत जुन्या सिडकोकालीन कमी व्यासाच्या मलनि:स्सारण वाहिन्या जीर्ण झाल्या असल्याने या वाहिन्या चोकअप होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर प्राप्त होत आहेत. तसेच पाणी पुरवठ्याच्या वाहिन्याही जुन्या झाल्या असल्याने पाण्याच्या दाबावर परिणाम होत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. या अनुषंगाने नेरुळ विभागातील सेक्टर 2 मध्ये एनएल 1 वसाहतींमधील वारणा ओनर्स असोसिएशन तसेच सेक्टर 8 मधील आण्णासाहेब पाटील माथाडी रहिवाशी असोसिएशनला भेट देऊन आयुक्तांनी वसाहतीअंतर्गत मलनि:स्सारण व पाणीपुरवठा वाहिन्यांची प्रत्यक्ष पाहणी केली.
त्याचप्रमाणे वाशी विभागातील सेक्टर 9 मधील जेएन -1, 2 मधील धोकादायक म्हणून घोषित करण्यात आलेल्या इमारतींपैकी गुलमोहर अपार्टमेंटला भेट देऊन तेथील सद्यस्थितीची त्यांनी पाहणी केली. या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव आलेला असून त्या अनुषंगाने आयुक्तांनी सहा. संचालक नगररचना श्री. ओवैस मोमिन यांच्याकडून माहिती घेतली व प्रत्यक्ष पाहणी केली.
वाशी विभागात सेक्टर 14 येथे प्लॉट नं. 4 व 5 या ठिकाणी समाजमंदीर बांधण्याचे काम सुरु असून यामध्ये मार्केटची व्यवस्थादेखील आहे. या कामाची तसेच सेक्टर 14 मधील भूखंड क्र. 45 ए येथे बांधण्यात येत असलेल्या चार मजली बहुउद्देशीय इमारतीच्या कामासही आयुक्तांनी भेट देऊन बांधकामाचा आढावा घेतला व कामाला गतीमानता देण्याचे निर्देश संबंधितांना दिले.
कोपरखैरणे विभागातही नेरूळप्रमाणेच सिडको वसाहतीअंतर्गत सेक्टर 7 येथील काही वसाहती अंतर्गत कामांची आयुक्तांनी पाहणी केली. तसेच ठाणे बेलापूर रस्त्यावर सुरु असलेल्या व प्रस्तावित असलेल्या कामांचीही त्यांनी पाहणी केली. यामध्ये पावणे येथील आलोक कंपनी शेजारी असलेल्या नाल्यावर एम.आय.डी.सी. क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर ये-जा करणा-या कामगार तसेच नागरिकांसाठी ठाणे बेलापूर रस्त्यावर पदपथाची आवश्यकता असल्याने नाल्यावर पादचारी पुल बांधणेकरीता अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देश आयु्क्तांनी दिले.
त्याचप्रमाणे ठाणे बेलापूर रस्त्यालगत असलेल्या सविता केमिकल्स, एस.के. केमिकल्स व रॅलिज इंडिया कंपनी जागेत आय.के.ई.ए. स्टोअर्स बांधण्यात येत आहे. या कंपन्यांसमोर पावसाळी कालावाधीत मोठ्या प्रमाणावर पाणी साठत असल्याने याठिकाणी सुरु असलेले गटारांची कामे व अनुषांगिक कामांची पाहणी करून ही कामे पावसाळ्यापूर्वी गतीमानतेने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
नेरुळ विभागात करावे गावाजवळ पामबीच मार्गावर काम सुरु असलेल्या भुयारी मार्ग कामाची आयु्क्तांनी प्रत्यक्ष पाहणी केली व कामाला गती देऊन लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे निर्देशीत केले.
नवी मुंबईकर नागरिकांना महानगरपालिकेच्या वतीने पुरविण्यात येणा-या सुविधा उत्तम दर्जाच्या असाव्यात व नागरी सुविधांची कामे विहित कालावधीत पूर्ण व्हावीत याकडे महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचे कटाक्षाने लक्ष असून प्रत्यक्ष पाहणी करून कामांना गती देण्यात येत आहे तसेच नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या दूर करण्याकडेही विशेष लक्ष देण्यात येत आहे.