शाळेचे मानद चेअरमन डॉ. भगवान दास यांची घेतली शिष्टमंडळाने भेट
पनवेल/प्रतिनिधी ओएनजीसी प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना केंद्रीय विद्यालयात प्रवेश नाकारल्याने २४ विद्यार्थ्यांच्या पालकांसह स्थानिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. त्याचा पाठपुरावा करताना पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली आज, गुरूवारी (दि. ३) सकाळी ११ वाजता ओएनजीसीचे मुख्य व्यवस्थापक तथा शाळेचे मानद चेअरमन डॉ. भगवान दास यांची भेट घेतली.
डॉ. दास यांनी सकारात्मक तोडगा काढण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, चेअरमन गोकुळदास यांच्यासोबत बैठक होणे महत्वाचे असल्याचे मत मांडले. आज, पुन्हा एकदा गोकुळदास यांना बैठक घेण्यासाठी निवेदन डॉ. दास यांच्यामार्फत त्यांना पाठविण्यात आले. उद्या सकाळी, सहाय्यक पोलिस आयुक्त प्रकाश निलेवाड यांची भेट घेवून त्यांना प्रकल्पग्रस्तांना ओएनजीसीकडून डावलण्याचे सातत्याने प्रयत्न होत असल्याने असंतोषाचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची माहिती त्यांना देण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांना प्रवेश न दिल्यास रास्ता रोको करण्यासाठीची तयारी स्थानिक करीत असून त्यासंदर्भातही निलेवाड यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असे कांतीलाल कडू व प्रकल्पग्रस्तांचे नेते आर. डी. घरत यांनी सांगितले. या शिष्टमंडळात कांतीलाल कडू, आर. डी. घरत, दिलीप परदेशी, संजय परदेशी, श्याम मढवी, शक्ती मढवी, नंदू घरत, नवनाथ मांगळूरकर, संजय चिखलेकर तर सुरक्षा रक्षक अधिकारी अनुराग तिवारी उपस्थित होते.