७६४ उमेदवारांची निवड, प्रकल्पग्रस्तांसाठीही जॉब फेअर, उद्योजकता मेळावा होणार
नवी मुंबई :- जीवनधारा वॉर्ड सल्लागार समिती रोजगार, व्यापार आणि उद्योगच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत रोजगार मेळाव्याचा लाभ २२१५ उमेदवारांना झाला. यापैकी ७६४ उमेदवारांची निवड झाली असून काहींना नोकरी प्राप्त झाली आहे तर काहींच्या मुलाखती होवून त्यांची नोंदणी निवड प्रकीयेच्या पुढील टप्प्यासाठी करण्यात आली आहे.
कोपरखैरणे येथील रा.फ.नाईक विद्यालयात सहाव्या रोजगार मेळाव्याचे उदघाटन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक यांच्या शुभहस्ते शुक्रवारी सकाळी करण्यात आले. रोजगार मेळाव्याचे आयोजक आमदार संदीप नाईक, महापौर जयवंत सुतार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, माजी महापौर सागर नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार संदीप नाईक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. लोकनेते गणेश नाईक यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम सुरु झाला आहे. लोकनेते नाईक यांनी त्यांच्या युवानेतृत्वाच्या काळात नवी मुंबईतील कारखान्यांमधून स्थानिक आणि इतर युवांना नोकरी मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख आमदार नाईक यांनी केला. देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढत असले तरी त्यावर टिका करीत बसण्यापेक्षा रोजगारइच्छूकांना रोजगार मिळवून देण्यासाठी काय करता येईल, याचा विचार केला आणि त्यामधून रोजगार मेळाव्याचा उपक्रम सुरु झाल्याचे ते म्हणाले. आजचा तरुण सकारात्मक विचार करणारा आहे. संकटातून मार्ग काढण्याचा त्याचा प्रयत्न असतो. ज्या उमेदवारांना रोजगार मेळाव्यात रोजगार मिळणार नाही. त्यांना ऐरोली येथे जीवनधाराच्या वतीने चालविल्या जाणार्या जॉब असिस्ट सेंटरमध्ये प्रशिक्षण देवून रोजगारक्षम करण्यात येईल, अशी ग्वाही आमदार नाईक यांनी दिली. बेलापूर विभागासाठी तसेच नवी मुंबईत इतर विभागात देखील रोजगार मेळावा भरविण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. ज्यांच्या त्यागातून नवी मुंबईत औद्योगिक क्षेत्र निर्माण झाले आहे त्या प्रकल्पग्रस्तांसाठी केवळ रोजगार मेळावाच नाही तर त्यांच्यामधून उद्योजक तयार व्हावेत, यासाठी देखील मेळावा घेण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
डॉ.संजीव नाईक यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात जीवनधाराच्या रोजगार मेळाव्यातून अनेकांना नोकर्यांचा आधार मिळाल्याचे सांगितले. लोकनेते गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार संदीप नाईक यांच्या कल्पकतेतून दरवर्षी हा मेळावा यशस्वी केला जातो, असे गौदवोदगार काढले. लोकनेते गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील उद्योग टिकवले आणि त्यामधून कामगारांचे रोजगार टिकवल्याचे डॉ.नाईक म्हणाले. रोजगारइच्छूक तरुण आणि तरुणींनी चिकाटी न सोडता प्रयत्न सुरु ठेवावेत, त्यांना निश्चितच यश मिळेल, असा सल्लाही डॉ.नाईक यांनी उपस्थित उमेदवारांना दिला.
रोजगारइच्छूक उमेदवारांनी उद्योजकही बनण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन महापौर सुतार यांनी केले. पालिकेच्या वतीने विविध व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते त्याचा लाभ घ्यावा, असे सांगून लोकनेते नाईक यांनी बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
सकाळी १० वाजता सुरुवात होवून सायंकाळी ५ वाजेपर्यत अतिशय शिस्तबध्द पध्दतीने हा रोजगार मेळावा पार पडला. बीपीओ, केपीओ, आयटी, फॅसिलिटी मॅनेजमेंट, फिनान्स, इन्शुरन्स, सिक्युरिटी, उत्पादन, टयुटोरियल्स, इंजिनिअरिंग, फूड, रिटेल, कम्प्युटर हार्डवेअर ऍन्ड नेटवर्कींग, हॉस्पिटल्स, सेल्स ऍन्ड मार्केटींग, हॉटेल इंडस्ट्री इत्यादी क्षेत्रातील कंपन्यांचे ७७ स्टॉल लावण्यात आले होते. एकूण ५०० कंपन्यांनी नोंदणी केली होती. मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांना सुप्रसिध्द मार्गदर्शक सुनिल रायकर यांनी करियर विषयक मार्गदर्शन केले. मुलाखतीची तयारी कशी करावी, मुलाखत कशी द्यावी याविषयी टिप्स दिल्या. मेळाव्यात ज्यांना नोकर्या मिळाल्या त्यांना मान्यवरांच्या हस्ते तात्काळ नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले.
मी नोकरीच्या शोधात होते. जीवनधाराच्या रोजगार मेळाव्यात नावनोंदणी केली आणि पहिल्याच प्रयत्नात मला टेलीकॉलरची नोकरी मिळाली.
-लक्ष्मी वाघमोडे, घनसोली
शिक्षण करता-करता नोकरी करण्याची इच्छा होती. त्याकरीता नोकरी शोधत होतो. जीवनधाराच्या रोजगार मेळाव्यात माझा नोकरीचा शोध संपला. मला डिमार्टमध्ये नोकरी मिळाली आहे.
-राहूल गोळे, कोपरखैरणे