बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचा दिवाळे गाव येथे पाहणी दौरा
स्वयंम न्युज ब्युरो :- ८३६९९२४६४६
* दिवाळे गावासाठी १० कोटी रूपयांची तरतूद
* सुसज्ज अशा मासळी बाजाराची लवकरच निर्मिती
* मासेविक्रीधारकांना मिळणार सुसज्ज गाळे
नवी मुंबई :- नवी मुंबईतील दिवाळे गाव हे मासेविक्री साठी प्रसिद्ध असून गावातील तसेच गावाबाहेरील अनेक नागरिक येथील मासळी बाजारात येत असतात. गावातील रस्ता हा अरुंद असल्याने तसेच मोठा मासळी बाजार भरत असल्याने तेथे वाहतूक कोंडी होऊन अनेक समस्या निर्माण होत आहेत. याच अनुषंगाने बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी गुरुवारी दिवाळे गावाचा दौरा केला. सदर दौर्यात तेथील अनेक समस्यांचे निराकरण करण्यात येऊन रस्ता रुंदीकरण करण्यात येईल. तसेच मासळी बाजार थोडे मागील बाजूस स्थलांतर करण्यात येऊन मासेविक्री धारकांना सुसज्ज असे गाळे तयार करण्यात येईल. तसेच प्लॅटफॉर्म, लिलाव हॉल, पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार असून सदर कामांसाठी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी १० कोटींची तरतूद करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेचे शहर अभियंता मोहन डगावकर, कार्यकारी अभियंता अजय संखे, मत्स्यव्यवसाय विभाग कार्यकारी अभियंता शिखलकर, कन्सल्टंटचे अभियंता प्रसाद पाटील, राधिका पवार उपस्थित होते.
यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, माझ्या बेलापुर विधानसभा मतदारसंघातील दिवाळे गाव हे मासेविक्रीसाठी प्रसिध्द असून सदर ठिकाणी मोठा मासळी बाजार भरतो. सदर बाजारात दररोज हजारो नागरिक या गावात येत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील स्थानिक कोळी बांधवांचे मासळी बाजार थोडे मागील बाजूस स्थलांतर करून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येईल. रस्ता रुंदीकरण केल्यास वाहतूक कोंडीची समस्याही सुटेल तसेच त्यांसाठी पार्किंगची व्यवस्थाही करण्यात येईल. मासेविक्री धारकांना मासे ठेवण्याकरिता स्टोरेज देऊन गाळे तयार करण्यात येईल. त्यामुळे त्यांसाठी सुसज्ज असे मासळी बाजार निर्माण होईल. तसेच प्लॅटफॉर्म, लिलाव हॉल, फळ मार्केट, भाजी मार्केट तयार करण्यात येणार असून सदर कामांसाठी १० कोटींची तरतूद करण्यात आल्याचे सांगितले. स्मार्ट सिटीच्या धर्तीवर दिवाळे गाव हे नवी मुंबईतील पहिले स्मार्ट गाव तयार करण्याचा माझा मानस असून लवकरच दिवाळे गाव हे स्मार्ट गाव म्हणून उदयास येणार असल्याचेही आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत जग्गनाथ कोळी, कैलास कोळी, वैशाली कोळी, सुरेखा कोळी, रियाज सिद्दिकी तसेच असंख्य महिला वर्ग व कोळी बांधव उपस्थित होते.