स्वयंम न्युज ब्युरो :- ८३६९९२४६४६
नवी मुंबई :- सिडको महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी लोकेश चंद्र 10 मे रोजी रूजु झाले. त्यांनी मध्यानपूर्व सिडकोच्या मुंबईमधील निर्मल भवन कार्यालयात सिडकोचे पूर्वीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्याकडून सिडको महामंडळाच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे स्वीकारली. या प्रसंगी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण, सहव्यवस्थापकीय संचालिका श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा, व मुख्य दक्षता अधिकारी विनय कारगांवकर हे उपस्थित होते. सिडकोच्या सेवेत रुजू होण्यापूर्वी श्री. लोकेश चंद्र गुंतवणूक व राजशिष्टाचार, महाराष्ट्र (इन्व्हेस्टमेंट एन्ड प्रोटोकॉल, महाराष्ट्र) या विभागात सचिव तथा आयुक्त तथा सहसचिव या पदावर कार्यरत होते.
1993 च्या तुकडीतील महाराष्ट्र कॅडर मधील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी लोकेश चंद्र मूळचे राजस्थानचे असून त्यांनी एम.टेक व बी. ई. सिव्हील या पदवी संपादन केल्या आहेत. लोकेश चंद्र यांनी यापूर्वी नागपूर महानगरपालिका येथे आयुक्त, केंद्रीय उर्जा मंत्रालय येथे संचालक, केंद्रीय गृह मंत्रालयात खाजगी सचिव व केंद्रीय पोलाद मंत्रालयात सहसचिव म्हणून त्यांनी यशस्वीपणे कार्यभार सांभाळला आहे.