केंद्रीय विद्यालयाची मग्रुरी जिरवण्यासाठी 14 मे पासून उपोषणप्रकल्पग्रस्तांचे नेते आर. डी. घरत यांनी दिले पोलिसांना पत्र
पनवेल :- विद्यार्थ्यांना प्रवेश देताना ऑन लाईन प्रक्रियेत गोंधळ निर्माण करणार्या काळुंद्रे येथील ओएनजीसी संचालित केंद्रीय विद्यालयाच्या प्रशासनाची मग्रुरी जिरवण्यासाठी अखेर स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे नेते आर. डी. घरत यांनी 14 मे पासनू बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचे लेखी पत्र पोलिसांना दिले आहे. पनवेल संघर्ष समितीने घरत यांना पाठिंबा देत उपोषणात सहभागी होणार असल्याचे कळविले आहे.
ओएनजीसी प्रकल्पाकरीता जमिन संपादन करताना शेतकर्यांसह स्थानिकांना दिलेल्या आश्वासनांची पायमल्ली करत ओएनजीचे मुख्य व्यवस्थापक तथा विद्यालयाचे मानद चेअरमन डॉ. भगवान दास, मुख्याध्यापक रंजन सिन्हा, दीपिका रॉय आणि चेअरमन गोपिनाथन या चौकडीने स्थानिकांच्या मुलांना प्रवेश नाकारून आव्हान दिले आहे.
त्यासंदर्भात पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांचे नेते आर. डी. घरत, स्थानिक नागरिकांनी रंजन सिन्हा, डॉ. भगवान दास यांना साकडे घालूनही ते विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकारघंटा वाजवत आहेत. त्यांतर शिष्टमंडळाने सहाय्यक पोलिस आयुक्त प्रकाश निलेवाड यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्यास विनंती केली होती. त्यांच्या निर्देशानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी शाळा प्रशासन व प्रकल्पग्रस्तांची बैठक बोलाविली होती. त्यातून काही तोडगा निघण्याची शक्यता दिसली नाही.
शाळा प्रशासनावर राज्य शासनाचा अंकुश नसल्याने 160 विद्यार्थ्यांची परवानगी असताना परप्रांतियांच्या मुलांना प्रवेश देताना चक्क 218 विद्यार्थ्यांना गैरमार्गाने प्रवेश देण्यात आल्याची तक्रार सृजाण पालकांनी केली आहे. खासदारांच्या नावाने प्रवेश दिला जातो, अशी लोणकढीही या चौकडीने पसरवण्यास सुरूवात केल्याने संपूर्ण प्रवेश प्रक्रिया संशयाच्या जाळ्यात अडकली आहे.
याबाबत संघर्षचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांना लेखी पत्राद्वारे विनंती करून स्थानिकांच्या 24 मुलांना विनाअट प्रवेश द्यावा, असे कळविले आहे. त्याशिवाय संपूर्ण प्रवेश प्रक्रियेबाबत केंद्रिय लाचलुचपत खात्याच्या वांद्रे-कुर्ला येथील कार्यालयात तक्रारी अर्जही दिला आहे. त्यामुळे या प्रकरणी शाळा प्रशासन अडचणीत येणार आहे.
दरम्यान, दोन दिवसात स्थानिकांच्या मुलांना प्रवेश देण्याबाबत सकारात्मक विचार न केल्यास येत्या सोमवारपासून (दि. 14) आर. डी. घरत आणि त्यांचे सहकारी ओएनजीसी प्रवेशद्वाराजवळ उपोषण छेडणार असल्याचे चव्हाण यांना लेखी पत्राद्वारे कळविले आहे.