आमदार संदीप नाईक यांनी महापौर जयवंत सुतार यांच्यासह केला पाहणीदौरा
नवी मुंबई :- ऐरोलीच्या सेक्टर ३ मध्ये असलेले राजमाता जिजाऊ रुग्णालय येत्या दोन महिन्यात पूर्ण क्षमतेने नागरिकांच्या सेवेत रुजू होईल, असा विश्वास आमदार संदीप नाईक यांनी व्यक्त केला आहे. आमदार नाईक यांनी शुक्रवारी या रुग्णालयाचा महापौर जयवंत सुतार यांच्या समवेत पाहणीदौरा केला आणि त्यामधील सुविधांचा तसेच उणिवांचा आढावा घेतला.
दिघा ते घणसोली दरम्यान राहणारे नागरिक मोठया संख्येने या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येत असतात. वैद्यकीय उपचार घेण्यासाठी या भागातील नागरिकांना वाशी येथील पालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात जाण्याचा त्रास वाचावा, या हेतूने ऐरोलीतील या रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या या रुग्णालयात ६०० त े८०० नागरिक बाहय रुग्ण विभागात उपचारासाठी दररोज येत असतात. पालिकेने नव्याने बांधलेली रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरु व्हावीत यासाठी डॉक्टर आणि इतर कर्मचारी भरतीचा आकृतीबंध देखील आमदार नाईक यांनी शासकीय स्तरावर पाठपुरावा करुन मंजूर करुन घेतला आहे. त्यामुळे डॉक्टर तसेच कर्मचारी भरतीची प्रक्रीया सुरु आहे. आमदार नाईक आणि महापौर सुतार यांनी रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी केली. या विभागांमध्ये असलेली कमतरता, उपलब्ध उपचारांच्या सोयी किंवा आभाव यांची माहिती घेतली. दररोज उपचार घेण्यासाठी येणार्या नागरिकांमध्ये महिलांचे प्रमाण ४० टक्के आहे. मुख्यत्वेकरुन प्रसृतीसंबधी उपचारासाठी महिला या रुग्णालयात येत असतात. त्यामुळे महिला डॉक्टरांची संख्या पुरेशी असणे गरजेचे आहे, असे आमदार नाईक म्हणाले. रुग्णालयात बालकांसाठी एनआयसीयूची सोय आहे. इन्क्युबेटर आले आहेत, ते लवकरता लवकर बसवावेत. मेडीकल स्टोरमध्ये प्रतिजैवकांसारख्या काही औषधांची कमतरता आहे.ही औषधे तातडीने उपलब्ध करुन द्यावीत. पालिकेच्या अभियांत्रिकी विभागाच्या मदतीने रुग्णालयात आवश्यक त्या दुरुस्त्या करुन घ्याव्यात, अशा सुचना केल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले. या रुग्णालयातील इन्क्युबेटर आणि व्हेंटिलेटरसाठी आमदार संदीप नाईक यांनी एकूण २० लाख रुपयांचा आमदारनिधी दिला आहे. सर्वसामान्य नागरिकांना इन्क्युबेटर आणि व्हेंटिलेटरच्या उपचारासाठी खाजगी रुग्णालयात जाणे परवडत नाही. या सुविधा आमदारनिधीतून या रुग्णालयात उपलब्ध होणार आहेत. पालिका आयुक्त डॉ रामास्वामी एन, आणि पालिकेच्या आरोग्य समितीच्या पदाधिकार्यांबरोबर चर्चा करुन आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन हे रुग्णालय येत्या दोन महिन्यात १०० टक्के क्षमतेने सुरु होईल, यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही आमदार नाईक यांनी याप्रसंगी दिली.
या पाहणीदौर्यादरम्यान आपली प्रतिक्रीया देताना महापौर सुतार म्हणाले की, पालिकेचे अभियांत्रिकी विभागाचे अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांनी एकत्रित बसून रुग्णालयातील प्रलंबित कामे लवकर मार्गी लावण्याच्या सुचना केल्या आहेत. औषध खरेदीच्या निविदा प्रक्रीयेस उशिर लागला तर रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण होतो. पालिका रुग्णालयांचा पुरेपुर लाभ नागरिकांना मिळाला पाहिजे, यासाठी आमदार नाईक यांचा सातत्याने पालिकेकडे पाठपुरावा सुरु असतो.
राजमाता जिजाउ रुग्णालयाच्या पाहणी दौर्याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, सेवादलअध्यक्ष दिनेश पारख, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष ऍड जब्बार खान,ऐरोली तालुकाअध्यक्ष अशोक पाटील, ऐरोली युवकअध्यक्ष राजेश मढवी, वॉर्उअध्यक्ष हिरामन नाईक, वॉर्ड अध्यक्ष नरेंद्र कोटकर, समाजसेवक पराग पाटील, समाजसेवक अनिल नाकते, मनसेचे निलेश बानखेले, पालिकेचे शहर अभियंता मोहन डगावकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ वर्षा राठोड आदी उपस्थित होते.