दीपक देशमुख
नवी मुंबई : मनपाच्या परिवहन विभागाबाबत नगर विकास विभागाकडे अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या. यासंबंधी नगर विकास विभागाच्या अवर सचिवांनी मनपा आयुक्तना तक्रारदारांच्या तक्रारींवर योग्य निर्णय घ्यावा अशा प्रकारचा आदेश देऊन दहा महिने उलटून गेले तरी कोणताही निर्णय झाला नसल्याने तक्रारदारांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
नवी मुंबईमधून तक्रारदारांमध्ये पी. बी. वैष्णव यांनी बेजबाबदार अधिकार्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत तर शंकर माडवळकर यांनी नवी मुंबई परिवहन उपक्रमातील भ्रष्टाचाराला आळा घालण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. तर कर्मचारी कामगार सेनेचे नवी मुंबईचे चिटणीस प्रकाश चिकणे यांनी मनपा परिवहन उपक्रमाच्या सेवाशर्ती मधील बदलाबाबत तक्रार दाखल केली आहे.
एल.टी.सानप यांनी नवी मुंबई परिवहन उपक्रमातील भ्रष्टाचारी अधिकार्यांची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. या चारही नागरिकांनी एप्रिल २०१७ ते जुलै १७ दरम्यान तक्रारी नगर विकास सचिव विभागा कडे केल्या आहेत. या सर्व तक्रारींचा विचार करून नगर विकास विभागाचे अवर सचिव नवनाथ वाठ यांनी मनपा आयुक्त एन.रामस्वामी यांना २६ जुलै २०१७ मध्येच आयुक्तांना एक पत्र देऊन जी तक्रारीची निवेदने प्राप्त झाली आहेत. त्यावर आपण लवकरात लवकर कार्यवाही करून अर्जदार व तक्रारदार याना परस्पर कळवावे. जर एखाद्या प्रकरणी शासन आदेशाची आवश्यकता भासल्यास त्याबद्दल सविस्तर प्रस्ताव आपल्या स्वंयस्पष्टअभिप्रायासह शासनास सादर करावा असे पत्रात अवर सचिवांनी नमूद केले आहे. परंतु हे पत्र आयुक्तांना येऊन दहा महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी त्यावर काहीही कारवाई झाली नसल्याने तक्रारदारांमध्ये नैराश्य पसरले आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांना विचारले असता, अवर सचिवांचा पत्र प्राप्त झाला असून याबाबत चौकशी करून कार्यवाही करतो असे सांगितले.