नवी मुंबई :- जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट(जेएनपीटी)मधील स्थानिक वाहतुकदारांनी गेले चार दिवस चालू ठेवलेला संप शनिवारी अखेर मागे घेतला. माजी मंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, शेकापचे नेते विवेक पाटील, कॉंग्रेसचे नेते महेंद्र घरत, राष्ट्रवादी कॉग्रेसचे रायगड जिल्हा सरचिटणीस प्रशांत पाटील आणि वाहतुकदार संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते.
डायरेक्ट पोर्ट डिलिवरी या धोरणानुसार जेएनपीटी प्रशासनाने पोर्ट ते उत्पादक कंपनी अशी वाहतुक करण्यासाठी पाच कंत्राटदारांची पाच निरनिराळया मार्गावर नेमणूक केली आहे. त्यामुळे स्थानिक वाहतुकदारांच्या व्यवसायाबददल अनिश्चितता निर्माण झाली आहे. जेएनपीटीच्या या निर्णयाविरोधात स्थानिक वाहतुक दारांच्या २० संघटनांनी संप पुकारला असून त्यामुळे जेएनपीटी बंदरातून होणारी शेतमाल आणि फळांची वाहतुक ठप्प झाली आहे. सुमारे ४०० कंटेनर पडून आहेत. निर्यात ठप्प झाली आहे. संपाची ही कोंडी फोडण्यासाठी बैठक झाली. जेएनपीटीचे उपाध्यक्ष निरज बन्सल यांच्याशी माजी मंत्री नाईक यांनी दुरध्वनीवरुन चर्चा करुन संपकरी वाहतुकदारांच्या न्याय मागण्या समजावून सांगितल्या. श्री नाईक यांनी सांगितले की, येत्या मंगळवारी वाहतुकदारांच्या प्रश्नी राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची एक बैठक होणार असून त्यामध्ये अंतिम तोडगा काढण्यात येणार आहे. वाहतुकदारांच्या प्रश्नी जोपर्यत सन्माननिय तोडगा निघत नाही तोपर्यत ज्या पाच कंत्राटदारांना वाहतुकीचा ठेका मिळाला आहे. त्यांनी काम सुरु करु नये, असे त्यांना सांगण्यात आले आहे. आणि त्यांनी ते मान्य केले आहे. त्यामुळे या संपामुळे शेतमालाचे आणि पर्यायाने शेतकर्यांचे नुकसान होवू नये यासाठी वाहतुकदारांनी संप मागे घेतला आहे. संपामुळे ठप्प झालेली शेतमालाची आणि फळांची निर्यात पुन्हा सुरु होणार आहे. गणेश नाईक आणि वरिष्ठ नेत्यांच्या आवाहनानुसार संप मागे घेण्याचा तोडगा काढला आहे, अशी प्रतिक्रीया नांदगावकर यांनी दिली आहे.